तिकीटांसाठी स्थानकातील तिकीट खिडकीच्या रांगेत प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून यूटीएस अॅपद्वारे स्टेशनवर असलेल्या क्युआर कोड स्कॅन करुन तिकीट काढण्याची सुविधा रेल्वेने आणली होती. मात्र आता पश्चिम रेल्वेकडून ही सुविधा बंद करण्यात येणार असल्याचे समजतेय.
क्युआर कोडवरुन तिकीट काढण्याच्या सुविधेचा प्रवाशांकडून गैरव्यापर होत असल्याचं रेल्वेचे म्हणणे आहे. त्यामुळं ही सुविधा बंद करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकल स्थानकात स्टॅटिक क्युआर कोडद्वारे पेपरलेस मोबाईल तिकीट बुकिंग बंद करण्यात आली आहे.
प्रवाशांना तिकीट खिडकीच्या रांगेत ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून यूटीएस अॅपच्या माध्यमातून डिजीटल तिकीटाची सुविधा आणण्यात आली होती. 2016 साली यूटीएस अॅप सुरू करण्यात आले. या अॅपद्वारे स्टेशनवर क्यूआर कोड स्कॅन करुन तिकीट काढता येते. परंतु अनेक तिकीट नसलेले प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये हे कोड स्कॅन करुन तिकीट काढत आहेत. त्यामुळं ही सेवा बंद करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर 30 स्थानके असून त्यावर 100 ते 125 असे क्युआर कोड असून ते आता निष्क्रिय केल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मध्य रेल्वेनेदेखील ही सुविधा बंद करण्यासाठी रेल्वे बोर्डाला पत्र पाठवलं आहे.
