नोकरीवरुन पतीला टोमणे मारणे पत्नीला महागात पडलं; कोर्ट म्हणालं, ‘सततची भांडणे किंवा..’

पती-पत्नीमधील नात्यासंदर्भात एका खटल्यामध्ये उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. पती बेरोजगार असल्याची सतत थट्टा करणे किंवा टोमणे मारणे, ही मानसिक क्रूरता आहे, असा महत्त्वाचा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णय देतानाच न्यायालयाने 52 वर्षीय पतीला घटस्फोट मंजूर केला आहे.

नेमके प्रकरण काय झाले?

या प्रकरणामधील पीडित पती अनिल कुमार सोनमणी यांचा विवाह 1996 मध्ये झाला होता. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पत्नीने मुख्याध्यापिका म्हणून उच्च पदस्थ नोकरी मिळवली. त्यानंतर तिच्या वागण्यात बदल झाला. सोनमणी हे स्वत: पेशाने वकील आहेत. कोरोना महासाथीत न्यायालये बंद झाल्याने कामकाज ठप्प झाले. त्या काळात पत्नीने त्यांना सतत ‘बेरोजगार’ म्हणून टोमणे मारले, अवास्तव मागण्या केल्या आणि किरकोळ कारणांवरून भांडणे केली.

कोर्टाने काय म्हटलं?

न्यायमूर्ती रजनी दुबे आणि न्यायमूर्ती अमितेंद्र किशोर प्रसाद यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. “पती-पत्नीमधील अवास्तव मागण्या, सततची भांडणे किंवा अपमानास्पद वर्तन, ही मानसिक क्रूरताच आहे आणि अशा परिस्थितीत घटस्फोट दिला जाऊ शकतो,” असं दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने म्हटलं. पत्नीला उच्च पदाची नोकरी मिळाल्यानंतर तिचे वागणे बदलल्याचा युक्तीवाद पतीकडून करण्यात आलेला.

ही क्रूरताच

खंडपीठाने घटस्फोट देताना निरीक्षण नोंदवले की, “पत्नीने पतीचा अपमान केला, वारंवार टोमणे मारले आणि छोट्या कारणांवरून वाद घातले, अवास्तव मागण्या केल्या. हे सर्व वर्तन मानसिक क्रूरतेत मोडते.”

पत्नीने पोलिसांना पत्र लिहून घर सोडलं

परिस्थिती 2020 मध्ये अधिक बिघडली. पत्नीने 19 वर्षीय मुलीला घेऊन घर सोडले, तर 16 वर्षीय मुलाला पतीकडे सोडून दिले. एवढेच नव्हे तर तिने पती आणि मुलासोबत सर्व संबंध तोडत असल्याचे पत्र लिहून भिलाई पोलिस ठाण्यात जमा केले. निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, नोटीस देऊनही पत्नी न्यायालयात हजर झाली नाही, तसेच कोणताही प्रत्युत्तर अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे पतीच्या बाजूने घटस्फोट मंजूर करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *