नांदेडमध्ये विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे ही घटना घडली आहे. मुलीला आणि तिच्या प्रियकराला पाय बांधून विहिरीत फेकण्यात आलं होतं. यामुळो दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरु आहे.
विवाहित मुलीला भेटण्यासाठी आलेला तिच्या प्रियकराची आणि मुलीची हत्या करून दोघांचे मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. उमरी तालुक्यातील बोरजुनी येथील रहिवाशी असलेल्या 19 वर्षीय संजीवनी कमळे आणि 17 वर्षीय लखन भंडारे याचे प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षी संजीवनीचा विवाह गोळेगाव येथील एका तरुणासोबत लावून देण्यात आला होता. लग्नानंतरही त्यांच्या भेटीगाठी सुरु होत्या
सोमवारी लखन संजीवनीला भेटायला गोळेगाव येथे आला होता. दोघांना एकत्र पकडल्यानंतर सासरच्या मंडळींनी संजीवनीच्या आई वडिलांना आणि नातेवाईकांना बोलावून घेतलं. नातेवाईकांनी गोळेगाव येथे येऊन दोघांना बेदम मारहाण करून हातापायाला दोरी बांधून मृतदेह बोरजुनी शिवारातील विहिरीत फेकून दिले. रात्री उशिरा दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी तीन आरोपीना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.