अंगातून भूतप्रेत काढलं, तर नवऱ्याशी जुळेल; सांताक्रुझच्या विवाहितेवर खोपोलीत अत्याचार, भोंदूबाबाला अटक

पती-पत्नी यांच्यातील वारंवार होणारे वाद मिटविण्यासाठी अंगातील भूतप्रेत काढावे लागेल. त्यासाठी जादूटोणा करावा लागेल, असे सांगून महिलेला खोपोली, महाड येथे नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलिसांनी अब्दुर लतीफ उर्फ बाबाजान या भोंदू बाबाला नवी मुंबई येथून अटक केली.

सांताक्रुझ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे पतीसोबत पटत नव्हते. त्यावेळी ही महिला बाबाजान याच्या संपर्कात आली. बाबाजान याने ‘तुझ्या अंगात भूतप्रेत आहेत आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येत आहे. जादूटोणा, काळीजादू करून हे अंगातील भूत काढून टाकावे लागेल. पण यासाठी नवी मुंबई, खोपोली आणि महाड येथे यावे लागेल,’ असे सांगितले.

सुखी संसारसाठी ही महिला बाबाजान सांगेल ते करायला तयार झाली. त्याने ज्या ज्या ठिकाणी नेले तेथे ती गेली. कधी अगरबत्तीचा धूर तर कधी अन्य द्रव्य देऊन बाबाजान याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जवळपास वर्षभर ही महिला बाबाजानचा अत्याचार निमूटपणे सहन करीत होती. मात्र त्याचा काहीच फायदा न झाल्याने फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *