कोकण रेल्वेने कार ऑन रेल्वे सेवा सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेची ही सेवा प्रवाशांसाठी फायद्याची ठरणार होती. मात्र या महत्त्वकांक्षी योजनेला अल्पप्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत एकाच कारचालकाकडून आरक्षण आलेल्या कोकण रेल्वेच्या कार वाहतुकीसाठीच्या रो-रो सेवालाच नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
कोलाड ते वेर्णा या दरम्यान पहिली रो-रो सेवा 23 ऑगस्टला सुरू होणार आहे. यासाठी आता प्रवासी 22 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रो-रो सेवा घोषित केल्यानंतर नोंदणीची अंतिम तारीख 18 ऑगस्ट निश्चित केली होती. संभाव्य ग्राहकांकडून नोंदणीसाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने ही मुदत 20 ऑगस्टपर्यंत वाढवली होती.
कोकण रेल्वेवरील सर्व अधिसूचित रो-रो सेवा 24 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान धावणार आहे. प्रवास तारीख वगळून प्रवास तारखेच्या तीन दिवस आधी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी स्वीकारली जाईल. उदाहरणार्थ रो-रो सेवा 1 सप्टेंबररोजी नियोजित असल्यास त्यासाठी 28 ऑगस्ट सायंकाळी 5 पर्यंत नोंदणी करणे शक्य होणार आहे.
किती असेल शुल्क
कोलाड ते वेर्णासाठी प्रति कार 7 हजार 875 रु. आणि कोलाड ते नांदगाव रोडसाठी 5 हजार 460 रु. शुल्क आहे. चार हजार रुपये नोंदणी शुल्क भरू आरक्षण करता येईल. उर्वरित रक्कम प्रवासादिवशी स्थानकावर भरावी लागणार आहे. रो-रो सेवेची क्षमता 40 कारची आहे. 16 गाड्यांपेक्षा कमी आरक्षण आल्यास ही सेवा चालवण्यात येणार नाही.
पूर्व नियोजित रो रो सेवेसाठी वाहन चालकांचा कमी प्रतिसाद लाभल्यास ही सेवा रद्द करण्यात येईल. संबंधित सेवेचे आरक्षण केलेल्या वाहन चालकाला नोंदणीच्या शेवटच्या तारखेला अर्थात प्रवासाच्या तीन दिवस आधी कळवले जाईल. तसेच भरलेली नोंदणी रक्कम पूर्णपणे परत करण्यात येणार आहे. रो-रो सेवेच्या तपशीलवार अटी व शर्ती आणि नोंदणी प्रक्रियेसाठी, इच्छुक वाहन धारकांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
