अनैतिक संबंधांना नकार, विवाहित एक्स गर्लफ्रेण्डला घरी जाऊन संपवलं, 31 वर्षीय आनंदने अखेर…

बेळगाव जिल्ह्यातील बीडी गावात रविवारी सकाळी हृदय पिळवटून टाकणारी दुहेरी शोकांतिका घडली. बालमैत्रीण असलेल्या एक्स गर्लफ्रेंडने अनैतिक संबंधांना नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने तिच्यावर चाकूने तब्बल 9 वेळा वार करून निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःवरही प्राणघातक वार करुन घेत आयुष्य संपवले. या घटनेने बीडी गावासह संपूर्ण बेळगावात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मृत महिलेचे नाव रेश्मा तिरवीर (वय 29, रा. बीडी) असून संशयित आरोपी आनंद सुतार (वय 31) हा आधी तिचा प्रियकर होता. दोघेही एकाच गावचे रहिवासी आणि लहानपणापासूनचे मित्र होते. त्यांच्यात कॉलेजपासूनच प्रेमसंबंध होते. मात्र रेश्माचे लग्न गावातीलच शिवानंद या युवकासोबत झाले, तर आनंदचेदेखील लग्न दुसऱ्या एका तरुणीशी झाले. मात्र तरीही दोघांमध्ये मागील काही वर्षांत अनैतिक संबंध सुरू असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

पतीने दिली होती पोलिसांत तक्रार

रेश्माचा पती शिवानंद याला पत्नी रेश्मा आणि आनंद यांच्यातील संबंधांची माहिती मिळाल्यानंतर त्याने नंदगड पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आनंदला ताब्यात घेऊन समज देत सोडून दिले. मात्र त्यानंतरही आनंद सतत रेश्माचा पाठलाग करत होता. शिवानंद घरात नसताना तो रेश्माला घरी भेटण्याचाही प्रयत्न करत असे.

हाच राग मनात धरुन गुरुवारी रात्री आनंद रेश्माला भेटण्यासाठी घरात शिरला. आनंदने संतापाच्या भरात रेश्माच्या पोटावर सलग नऊ वेळा चाकूने वार केले. यात रेश्माचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या आनंदने स्वतःच्या छातीवर 5-6 वेळा वार करून आत्महत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात दोघांचेही मृतदेह पडले होते. ही घटना कळताच स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. बैलहोगल उपविभागीय पोलिस अधिकारी वीरेश हिरेमठ यांनीही घटनास्थळी भेट दिली.

या दुहेरी घटनेमुळे बीडी गावात शोककळा पसरली आहे. पती शिवानंद व रेश्माचे कुटुंबीय या घटनेमुळे हादरून गेले आहेत. अनैतिक नातं तुटल्यामुळे सूडभावनेतून आनंदने केलेला हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नंदगड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा समाजात प्रेमसंबंध, वैवाहिक नातं व नैराश्य यांमधील संघर्षाची तीव्रता अधोरेखित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *