नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील पाटील पार्कमधील श्रीकृष्ण मंदिराच्या मागील गल्लीत साधूंच्या वेशातील तीन भामट्यांनी ‘दीक्षा’ घेण्याच्या बहाण्याने एका महिलेला भुरळ घालून तब्बल 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भिक्षेच्या बहाण्याने पोहोचले घरापर्यंत
सदर घटना 10 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. तीन जण साधूच्या वेशात पाटील पार्क परिसरात फिरत होते. त्यांनी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने एका महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी महिलेला ‘दीक्षा’ घेण्याचा आग्रह करत, तिचा विश्वास संपादन केला.
महिलेला ‘धार्मिक कृतीतून कल्याण होईल’, असे सांगत सुरुवातीला 500 रुपये देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर “एक किलो तूप आणा”, “चहा पाजा”, अशा मागण्या करत घरातील सदस्यांना गुंतवून ठेवले. दरम्यान, त्या तिघांनी महिलेच्या हातावर ‘रक्षा’ बांधली व तिच्या मनावर प्रभाव टाकत भुरळ घातली.
20 हजार रुपयांचा ऐवज घेऊन फरार
महिलेच्या घरात असलेला एकूण 20 हजार रुपयांचा ऐवज त्यांनी हातोहात उचलला आणि घटनेनंतर क्षणात पसार झाले. काही वेळानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पतीने तातडीने एमआयडीसी चुंचाळे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सदर घटना गजबजलेल्या भागात भरदिवसा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक वेशात फसवणूक करणाऱ्या टोळ्यांबाबत पोलिसांनी जनतेने सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Nashik Crime : दुकानावर भरदिवसा दरोडा; तिघांना अटक
सिडकोतील गजबजलेल्या शिवाजी शॉपिंग सेंटरमधील दुकानात (दि. 11) दुकानदारासह सेल्समनला मारहाण करून दरोडा टाकत भरस्त्यात राडा घालणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. स्वप्निल सुभाष कावले (26, रा. लेखानगर), राहुल विठ्ठल पालटे (२२,रा. इंदिरा गांधी बसाहत, सिडको), सनी राजू आठवले (20, रा. इंदिरा गांधी वसाहत, सिडको) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. तर, संशयित गुड्डु उर्फ प्रेम एकनाथ सावंत, सुफियान सलिम शेख अशी पसार झालेल्या संशयितांची नावे आहेत.
सतीश संजय तुपसमुद्रे याच्या फिर्यादीनुसार, तो शिवाजी शॉपिंग सेंटरजवळ असलेल्या विकास वसंतराव गाणोरे (रा. भुजबळ फार्मच्या मागे) यांच्या दुकानात काम करीत होता. सोमवारी (दि. 11) सायंकाळी साडेसातच्या सुमारास संशयितांनी रस्त्यावर राडा घालून हातात लोखंडी गज घेऊन दुकानात प्रवेश केला. हत्यारांची भीती दाखवून त्यांनी गल्ल्यातील पैशांची मागणी केली. गाणोरे व सतीश यांनी विरोध केला असता त्यांनी संगनमत करून गजाने सतीशच्या डोक्यात दुखापत केली. दुकान मालकालाही मारहाण केली. त्यानंतर, दुकानाच्या गल्ल्यातून हजार रुपये जबरीने काढून नेले. या राड्यानंतर बाहेर येऊन रस्त्यावर दहशत माजवली. ‘आम्ही या एरियाचे डॉन असून, कोणी मध्ये आले तर कापून टाकू, अशी धमकी दिली. अनेक दुकाने बंद झाल्यावर संशयितांनी रस्त्यालगतच्या वाहनाच्या (एमएच 01 सीआर 3481) काचा फोडल्या. याप्रकरणी अंबड पोलिसात दरोड्यासह गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.