घरातून निघाले, काही अंतरावर गाडी पार्क अन् शिक्षकाने जीव दिला, संसार उघड्यावर

भंडाऱ्यात एका शिक्षकाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. झाडाला गळफास घेत या शिक्षकाने आपले आयुष्य संपवलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
भंडारा तहसीलमधील मानेगाव (बाजारपेठ) येथील चैतन्य विद्यालयात काम करणाऱ्या या शिक्षकाने झाडाला दोरीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली. ही घटना सोमवारी 11 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता उघडकीस आली. मृत शिक्षकाचे नाव रमेश शामराव पंचबुद्धे (वय वर्ष 44) असं असल्याची माहिती आहे, ते खुर्सीपार येथील राहणारे आहेत. मानेगावच्या चैतन्य विद्यालयात काम करणारे गणिताचे शिक्षक रमेश पंचबुद्धे हे खुर्सीपार येथे राहत होते. ते खुर्सीपारहून रावणवाडी कॅम्पसमार्गे मानेगावला ये – जा करत असत.

सोमवारी दररोजप्रमाणे ते मानेगावला जाण्यासाठी घरून निघाले. पण, शाळेत पोहोचले नाहीत. या दरम्यान, दुपारी 12.30 वाजता वन विभागाचे कर्मचारी वन परिसरात गस्त घालत असताना त्यांना रस्त्याच्या काही अंतरावर एक दुचाकी पार्क केलेली दिसली. वन कर्मचाऱ्यांनी वन परिसरात जाऊन पाहिले, तर त्यांना झाडावर त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. रावणवाडी परिसराचा हा भाग अड्याळ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असल्याने अड्याळ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली आणि घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.एक मैत्रीपूर्ण शिक्षक म्हणून ओळखले जाणारे रमेश पंचबुद्धे यांनी असे पाऊल का उचलले, त्यांनी जीव देण्याचा इतका टोकाचा निर्णय का घेतला, यामागील कारणांचा तपास सध्या पोलिस करत आहेत. पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *