सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात आई-वडील दोघंही नोकरीला असल्याने मुलांना डे-केअरमध्ये ठेवलं जातं. कधी ध्येय पूर्ण करण्याच्या हेतूने तर पैसे कमावण्याच्या हेतूने आई-वडील दोघंही नोकरी करण्यासाठी हतबल असतात. अशावेळी इच्छा नसतानाही मुलांसाठी डे-केअरचा पर्याय निवडला जातो. मात्र नोएडामधील डे-केअरमधील घटनेनंतर मुलांना तिथे ठेवणं कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. नोएडामध्ये एका 15 महिन्याच्या बाळाचा अमानुष छळ करण्यात आला आहे. डेकेअरमध्ये ज्या महिलेवर मुलाला सांभाळण्याची जबाबदारी होती, तिनेच त्याचा छळ केला आहे.
महिला बाळाच्या कानाखाली मारत असल्याचं, उचलून जमिनीवर आपटत असल्याचं सीसीसीटीव्हीत कैद झालं आहे. इतकंच नाही तर बाळाच्या शरिरावर चावे घेतल्याच्या खुणाही आहेत.
नोएडाच्या सेक्टर 137 मधील पारस टिएरिया निवासी संकुलातील डेकेअरमध्ये ही घटना घडली आहे. रहिवाशांच्या संघटनेद्वारे चालवले जाणारे हे डेकेअर दिल्ली एनसीआरमधील निवासी संकुलांमध्ये चालणाऱ्या अशा असंख्य युनिट्सपैकी एक आहे. पालक त्यांच्या बाळांना कामावर जाताना या डेकेअर युनिट्समध्ये सोडतात आणि परतल्यावर त्यांना घरी घेऊन जातात. या भयानक घटनेमुळे कॉम्प्लेक्समध्ये संताप आणि भीतीचं वातावरण आहे.
