पथकाकडून सामाजिक ऐक्याचा आणि मायमराठीचा संदेश…

 गणेशोत्सव… सर्वदूर साजरा होणाऱ्या या उत्सवाचा या सणाचा उच्चार जरी केला, तरीही कमालीची सकारात्मकता त्या उच्चारातूनच जाणवते. अशा या उत्सवाचं खरं रुप  मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये अधिक उत्साही वातावरणात आणि नवनवीन शैलीत दिसून येतं. ज्याप्रमाणं पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की मानाच्या गणपतींची चर्चा होते. अगदी त्याचप्रमाणे मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं की लगेचच डोळ्यांपुढे उभं राहतं ते म्हणजे लालबाग- परळ आणि गिरगाव.

गणेशोत्सवाची नगरी आणि उत्साही वातावरण

गणेशोत्सव सुरू होण्याच्या काही महिने आधीपासून खऱ्या अर्थानं गिरणगाव अशी ओळख असणाऱ्या या लालबाग- परळमध्ये गणपतींच्या मूर्ती साकारण्यासाठीच्या चित्रशाळा उभ्या राहतात, मोठे मंडप उभे राहतात आणि त्यात मान वर करून पाहावं लागेल इतक्या भव्य मूर्ती कलाकार- मूर्तीकार साकारत असतात. अशा या मूर्ती यंदाच्या वर्षीच्या सोहळ्यासाठी मंडपांच्या दिशेनं मार्गस्थ होण्यास सुरुवात झाली आहे.

काळाचौकीच्या महागणपतीचं आगमन आणि ढोलताशा पथकाची सलामी…

नुकतंच मुंबईच्या याच परिसरातील लोकप्रिय अशा काळाचौकीचा महागणपती या गणेशमंडळाकडून गणपतीची भव्य मूर्ती मंडपात नेण्यात आली. अतिशय दिमाखदार अशा आगमन मिरवणुकीतून मार्गस्थ झालेली ही मूर्ती पाहण्यासाठी अनेकांनीच तोबा गर्दी केली. याच गर्दीचं लक्ष वेधलं ते ढोलताशाच्या गजरानं. ढोलाचा पहिला ठोका पडला आणि ताशाची तर्री वाजताच वादकांवर कॅमेरांच्या नजरा खिळल्या. कारण, इथं दिसणारं दृश्य काहीसं अनपेक्षित पण तितकंच अभिमान वाटेल इतकं कमाल होतं.

पथकाकडून सामाजिक ऐक्याचा आणि मायमराठीचा संदेश…

मुंबईतील मोरया ढोल ताशा आणि ध्वज पथकानं दरवर्षीच गणेशोत्सवातील वादनांच्या वेळी नव्या संकल्पना सादर केल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी त्यांच्या सादरीकरणाचा विषय होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण. महाराष्ट्रात मराठीचाच आवाज घुमणार आणि तोसुद्धा सामाजिक ऐक्य जपत, जात,धर्म, पंथ यांच्यातील वादाला पायदळी तुडवत…. असा कमाल संदेश पथकानं यावेळी दिला आणि पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहता ही पथकाला मिळणारी शाबासकीचीच दाद होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *