‘माझ्याकडे काय सोन्याची खाण आहे का?’ असं अनेकदा खर्च वाढू लागला की काहीजण उपरोधिकपणे म्हणताना दिसतात. बरं, प्रत्यक्षात सोन्याची खाण सापडण्याच्या आणि त्यातून कैक टन सोनं बाहेर काढण्यात आल्याच्या घटनासुद्धा आजवर अनेकदा पाहण्यात आल्या आहेत. इथं सोन्याचीच चर्चा सुरू असताना एकाएकी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांनीसुद्धा काहींचं लक्ष वेधलं आहे.
मुंबईत समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत सोनं- चांदी?
मुंबईचा समुद्र म्हणजे अनेकांसाठीच आकर्षणाचा विषय. शहरात असणाऱ्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर आता आठवडी सुट्टीच नव्हे, तर वर्षभर पर्यटकांची, समुद्राची गुजगोष्टी करणाऱ्यांची, विनाकारण तिथं फिरकणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. यातच काही मंडळी मात्र चक्क या समुद्र किनाऱ्यांवर वाळूमध्ये सोनं- चांदीच्या शोधात आहेत म्हणे.
जाणून आश्चर्य वाटेल, पण पाहा नेमकं घडलं तरी काय…
मुंबईतीच जुहू चौपाटी किंवा जुहू बीच परिसरात कायमच पर्यटकांची गर्दी असते. अशा या भागात काहीजण आपल्या कुटुंबासह साधारण गुडघाभर पाण्यात उतरून हातात असणाऱ्या धातूच्या गोल जाळ्यांमध्ये समुद्रातील वाळू गाळताना दिसत आहेते. वाळुमिश्रित पाणी चाळणीत घेत हेलकावणाऱ्या लाटांच्याच पाण्याच्या मदतीनं ही वाळू गाळत आहेत. यामागचं कारण हैराण करणारं आहे, पण, तलासरी, उंबरगाव, सुरत यांसोबतच इतर राज्यांतून आलेल्यांना याच गाळण प्रक्रियेतून तीन तोळं सोनं सापडल्याचं म्हटलं जात आहे.
कधीपासून सुरू आहे हे गाळणकाम?
वाळुतून सोनं-चांदी शोधण्यासाठी या नागरिकांची येण्याची ही पहिलीच वेळ नसून, पावसाळ्यात दरवर्षी साधारण 100 हून अधिक मंडळी यासाठी येतात. यंदाच्या वर्षी मागील तीन महिन्यांपासून इथं हे काम ते करत असल्याचं दिसून आलं.
वाळूतील खड्ड्यांमुळं जीवाला धोका!
उपलब्ध माहितीनुसार मागील काही दिवसांपासून या भागात गाळकाम करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली असून, समुद्रातील वाळुतून सोनं- चांदी मिळवण्यासाठी ही मंडळी वाळूत खड्डे कत आहेत आणि हेच खड्डे सामान्य पर्यटकांचा जीव धोक्यात घालत आहेत. मागच्याच आठवड्यात अशाच एका खड्ड्यामुळं या भागात एका पर्यटकानं जीवही गमावल्याचं म्हटलं गेलं.
समुद्राच्या पाण्याखाली मोठे खड्डे तयार होत असल्यानं पावसाळ्याच समुद्र खवळल्यानंतर त्या भागांमध्ये ‘डीप करंट’ तयार होत असून, त्यामुळं समुद्राच्या लाटांचा आनंद घेणाऱ्यांचं आयुष्य धोक्यात येत आहे. दरमयान, पालिका प्रशासन, पोलीस आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने समुद्रात खड्डे करण्याऱ्या या नागरिकांना वेळीच थांबवलं नाही, तर मुंबईचे समुद्रकिनारे धोकादायक होतील ही बाब नाकारता येत नाही.