मंदिराच्या पायरीवर चप्पल काढल्याच्या कारणावरुन, चौघाजणांनी एका वृद्धास बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड येथील दत्तमंदिरात नुकतीच घडली.
या प्रकरणी राजीव टेंबे या 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाळासाहेब कलाटे, विक्रम कलाटे व दोन अनोळखी इसमांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली आहे.
टेंबे हे वाकड येथे राहणा-या आपल्या जावई आणि मुलीकडे राहतात. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास वाकड येथील दत्तमंदिरामध्ये ते आपल्या नातीसह पाया पडण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी आपली चप्पल मंदिराच्या पायरीवर सोडली होती. ते मंदिरात पाया पडण्यासाठी गेले असता तेथे आलेल्या बाळासाहेब कलाटे व विक्रम कलाटे यांनी ‘मंदिराच्या पायरीवर चप्पल का सोडली’ असे विचारत त्यांना शिवीगाळ केली . तसेच बाळासाहेब व त्याच्या चारही साथीदारांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी झालेल्या मारहाणीत टेंबे यांच्या हनुवटीला तीन टाके पडले असून डोळ्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
मंदिर व्यवस्थापनाने मात्र मारहाणीच्या आरोपांचा इन्कार केला आहे. मंदिराबाहेर चप्पल काढण्याबाबत समज देत असताना झटापट झाल्याचा दावा मंदिराचे विश्वस्त करीत आहेत.
किरकोळ कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला एवढी बेदम मारहाण करण्याच्या प्रकाराबद्दल परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

