सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 व चित्रपती कै. व्ही. शांताराम तसेच स्व. राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025 तसेच 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा वरळी येथे एसव्हीपी स्टेडियम, डोम येथे मंगळवारी सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे,” असे प्रतिपादन केलं.
महाराष्ट्र शासनाची भूमिका केली स्पष्ट
“मराठी रंगभूमी ही जगातील सर्वोत्कृष्ट रंगभूमी आहे. छोटा पडदा, मोठा पडदा, ओटीटी प्लॅटफॉर्म अशा विविध माध्यमांत मराठी कलावंतांनी अप्रतिम योगदान दिले आहे. केवळ कलावंतच नाही तर पडद्यामागे काम करणाऱ्या सर्वांचा मनापासून गौरव व्हावा, हीच महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
अनुपम खेर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
अनुपम खेर यांच्या बहुप्रतिभावान अभिनयाचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “पहिल्याच चित्रपटात 70 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारणारे खेर आजही तितक्याच उत्साहाने अभिनय करत आहेत,” असे उद्गार काढले.
मुक्ताचा मोनोलॉग, मांजरेकरांचा अभिनय अन् पांचाळेंची गझल
मुक्ता बर्वे यांच्या 360 अंश अभिनय क्षमतेचा, विशेषतः ‘चार चौघी’ मधील त्यांच्या मोनोलॉगचा, तसेच महेश मांजरेकर यांच्या दमदार अभिनय आणि दिग्दर्शनाचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव केला. गझलकार भीमराव पांचाळे यांचा उल्लेख करताना फडणवीस यांनी, “सुरेश भट आणि भीमराव पांचाळे यांची जोडी मराठी गझलांना अविस्मरणीय उंचीवर घेऊन गेली,” असं मत व्यक्त केलं.