खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात नागरिकांचा मृत्यू होण्याच्या घटना नवीन नाहीत. पुण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. खड्ड्यात अडकून दुचाकी पडल्यानंतर वृद्धाला मागून येणाऱ्या कारने चिरडल्याची दुर्घटना घडली.
जगन्नाथ काशिनाथ काळे असं 61 वर्षीय मयत ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. पुण्यातील औंध भागातील गजबजलेल्या राहुल हॉटेलसमोर ही घटना घडली. अपघाताचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतला आहे. औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोरुन दुचाकी चालवत असताना ही भीषण अपघात झाला. रस्ता आणि पेव्हर ब्लॉकच्या मध्ये खड्डा निर्माण झाल्यामुळे या खड्ड्यातून जाताना वृद्धाची गाडी घसरली. यामुळे त्याचा तोल गेला आणि तो रस्त्यावर कोसळला.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेवढ्यात मागून एक गाडी आली आणि त्या कारच्या चाकाच्या खाली चिरडले गेल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाला प्राण गमवावे लागले. जगन्नाथ काशिनाथ काळे असं 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. या संपूर्ण अपघाताचा संपूर्ण थरार भागातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
खड्ड्यांविरोधात ‘आप’चे आंदोलन
दुसरीकडे, आम आदमी पक्षाच्या वतीने गणेशपेठ मुख्य बसस्थानक चौकात गुरुवारी ‘खड्ड्यात समाधी’ आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व डाव उधळून लावला.
सर्वसामान्य व पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही खड्डे बुजवण्यात आले नाहीत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचते व नागरिकांना त्याची खोली कळत नाही. परिणामी, अनेक अपघात होऊन जखमी होतात. या गंभीर समस्येकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ‘आप’ने केला.
आंदोलन सुरू होण्यापूर्वीच प्रशासन कामाला लागले आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. त्यामुळे प्रतीकात्मक समाधी घेण्याआधीच ताब्यात घेऊन आंदोलनकर्त्यांना गणेशपेठ पोलिस ठाण्यात नेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व शहर संघटन सचिव गिरीश तितरमारे यांनी केले. यात रोशन डोंगरे, प्रशांत अहिरराव, जॉय बांगडकर, सचिन लोणकर, मनोज डोंगरे, शिरीष तिडके, ज्योती गौर, अलका पोपटकर, पुष्पा डाभरे, शारदा गौर, रितू तिवारी व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील रस्ते तात्काळ दुरुस्त करा, बुजवा, अन्यथा तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.