राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या 5 व्या वर्षपूर्तीनिमित्त मुंबई विद्यापीठाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्याना आता पदवीचे शिक्षण घेतानाच प्रत्यक्ष उद्योगाधारित अनुभव आणि कौशल्ये आत्मसात करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कौशल्य-आधारित उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनाला अनुसरून, मुंबई विद्यापीठ आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या कौशल्य प्रशिक्षण मंडळ (बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग) (BOAT) पश्चिम विभाग यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या 5 व्या वर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे आयोजित केलेल्या ‘अखिल भारतीय शिक्षा समागम 2025’ या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत या कराराचे हस्तांतरण करण्यात आले.
मुंबई विद्यापीठाचा कोणाशी करार?
मुंबई विद्यापीठाने एईडीपीसाठी एससीएम इन्व्हेंचर, बिस्मार्क वर्ल्ड, सिटी लिंक लॉजिस्टिक्स, वीणा वर्ल्ड, क्रिएटिव्ह माइंड्स, स्टँपमायव्हिसा, मचाओ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट, ॲडव्हान्स्ड पेंट्स आणि रिटेलर्स एसोसिएशन ऑफ स्किल कौन्सिल ऑफ इंडिया अशा नामांकित औद्योगिक भागीदारांसोबत सामंजस्य करार केले आहेत. गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या करारांची नजीकच्या काळात व्याप्ती वाढवली जाणार आहे. तसेच एईडीपीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कौशल्य प्रशिक्षण मंडळाच्या वतीने अभियांत्रिकी, वाणिज्य, कायदा आणि व्यवस्थापन यांसारख्या विविध शाखांमधील पदवीधर शिकाऊ उमेदवारांच्या नेमणूकीसाठी सहाय्य केले जात आहे.
शिकाऊ उमेदवारी दरम्यान कसा फायदा?
शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळालेलेल्या क्रेडिट्सचे मूल्यांकन विद्यापीठाच्या नियमानुसार आणि यूजीसी-अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री फ्रेमवर्क नुसार केले जाणार असून, यामध्ये विद्यार्थ्यांनी कामाच्या ठिकाणातील शिकण्याचे अनुभव, नियमित अहवाल, पर्यवेक्षकाचे अभिप्राय आणि मौखिक परीक्षा तथा सादरीकरण यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे क्रेडिट्स विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ट्रान्सक्रिप्टमध्ये नोंदवले जाणार असून सीजीपीएसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
प्रशिक्षणा दरम्यान कोणती तरतूद?
नियमित शिकाऊ उमेदवारी क्रेडिट्स व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अतिरिक्त शिक्षण क्रेडिट्स मिळवता येतील. ज्यामध्ये शिकाऊ उमेदवारी दरम्यान दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन/ऑफलाइन मॉड्यूल्सचे उदा. मूक्स, उद्योग-नेतृत्वाखालील सत्रे) पूर्तता करणे. प्रोजेक्ट वर्क, कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा किंवा शिकाऊ उमेदवारीशी संबंधित नवोपक्रम/उद्योजकता उपक्रमांमध्ये सहभाग घेणे आणि औद्योगिक भागीदारांनी किंवा बीओएटीच्या मान्यताप्राप्त संस्थांनी दिलेल्या प्रमाणपत्र कार्यक्रमांची पूर्तता करणे या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अतिरिक्त क्रेडिट मिळवता येतील.
काय म्हणाले कुलगुरू?
या महत्त्वपूर्ण कराराच्या अनुषंगाने उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील सहकार्य अधिक बळकट करून विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासोबतच प्रत्यक्ष उद्योगाधारित अनुभव आणि कौशल्ये आत्मसात करता येतील. या सहकार्यांतर्गत विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांबरोबरच, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा, फिनटेक आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्येही विशेष अभ्यासक्रम व प्रशिक्षणे सुरू केली जाणार असून यामुळे विद्यार्थी भविष्यातील उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज होणार असल्याचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञानच नव्हे, तर प्रत्यक्ष कार्यानुभव, अद्ययावत कौशल्यविकास आणि सध्याच्या रोजगार बाजारपेठेसाठी आवश्यक असलेली रोजगारक्षमता प्रदान करण्यास सहाय्यभूत होणार आहे. उच्च शिक्षण अधिक परिणामकारक आणि रोजगाराभिमुख बनविण्यासाठी या कराराचे महत्व अधोरेखित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.