अलिबागजवळ मोठी बोट दुर्घटना; 5 खलाशांनी तब्बल 9 तास पोहत समुद्र किनारा गाठला; खंदेरी किल्ल्याजवळ थरार

अलिबागजवळ मोठी बोट दुर्घटना घडली आहे.  अलिबागजवळ एक मच्छीमार बोट बुडाल्याची घटना घडली. यावेळी बोटीवरच्या 5 खलाशांनी तब्बल 9 तास पोहत समुद्र किनारा गाठला. खंदेरी किल्ल्याजवळ थरार पहायला मिळाला. मुसळधार पावसासह समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा इसारी हवामान खात्याने दिला होता.

अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ एक मच्छीमार बोट बुडाली.  त्यावरील 5 खलाशांनी पोहत समुद्र किनारा गाठला आहे. त्या पाचही जणांना अलीबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत . बोटीवर एकूण आठ खलाशी होते. उर्वरित तीन खलाशांचा शोध सुरू आहे. शनिवारी सकाळी 7 वाजता करंजा येथील मच्छीमार बोट समुद्रात मासेमारी साठी निघाली. सकाळी आठ वाजता खांदेरी किल्ल्याजवळ आली असता ही बोट लाटांच्या जोरदार माऱ्याने बुडाली.

बोटीवरील 5 खलाशांनी खवळलेल्या समुद्रात तब्बल 9 तास पोहून ते दिघोडी किनाऱ्यावर लागले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात आणले. मासेमारीवरील बंदी उठायला आणखी आठवडा बाकी असतानाच मच्छीमार बोटी समुद्रात गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हवामान विभागाने लोकांना समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असे आवाहन केले होते. मुंबई, रायगड, पालघर, नवी मुंबई, ठाणे आणि कोकण भागात अधूनमधून मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यासाठी पुढील काही तास सतर्कतेचे असणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी हाय अलर्ट देण्यात आलाय. पुढील 24 तास अनेक जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आणि विदर्भातील अमरावतीमध्ये वीजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. परिणामी घाट परिसरातील तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *