‘अॅक्सिस बँके’च्या एटीएममध्ये बनावट नोटा भरून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूरच्या गडहिंग्लज पोलिसांनी माग काढत थेट बांगलादेश सीमेपर्यंत छडा लावला आहे. या कारवाईत मलिक अफसरअली शेख (32) आणि टोनी जहरुद्दीन शेख (23) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील फराका तालुक्यातील परसुजापूर येथील रहिवासी आहेत.
सुरुवात एटीएममध्ये ‘छापल्या’ नोटांपासून
17 जून रोजी गडहिंग्लजमध्ये आकाश रवींद्र रिंगणे या तरुणाने एटीएममध्ये 500 रुपयांच्या 35 बनावट नोटा भरल्याची घटना उघड झाली. यावरून सुरू झालेल्या तपासात पोलिसांनी धागेदोरे पकडत एकामागून एक 10 जणांपर्यंतची साखळी शोधून काढली. आकाशच्या अटकेनंतर नितीन कुंभार, अशोक कुंभार, दिलीप पाटील, सतीश कणकणवाडी, भरमू कुंभार आणि अक्षय कुंभार यांची नावं समोर आली. यातील मुख्य सूत्रधार अशोक कुंभारची तुरुंगात असताना टोनीच्या वडिलांशी ओळख झाली, आणि त्यातूनच बनावट नोटांची तस्करी सुरू झाली, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
