जगातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट सध्या अभूतपूर्व यशाच्या शिखरावर आहे. कंपनीच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होतेय. असं असतानाही कंपनीने अलीकडेच 15 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नाडेला यांनी या निर्णयाबाबत दुख: व्यक्त केले आहे. त्यांनी कंपनीतील 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना एक पत्र (मेमो) लिहून या कपातीमागील कारणे सांगितली. तसेच कंपनीच्या भविष्यातील योजनांबाबत स्पष्टता आणली. त्यांचे हे पत्र वाचून सर्वसामान्यांन नोकरदारवर्गालाही धडकी भरेल.
मायक्रोसॉफ्टची भविष्यातली योजना काय?
मायक्रोसॉफ्ट आता केवळ सॉफ्टवेअर कंपनी म्हणून राहू इच्छित नाही, तर ती कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात आघाडीची कंपनी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात अलीकडील कर्मचारी कपातीमुळे आपल्याला तीव्र दुख: झाल्याचे नमूद केले आहे. त्यांनी या निर्णयाला कंपनीच्या इतिहासातील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. या कपातीचा परिणाम आपल्या सहकाऱ्यांवर, सांघिक सहकाऱ्यांवर आणि मित्रांवर झाला आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले. या पत्रात नाडेला यांनी कर्मचारी कपातीमागील कारणे आणि कंपनीच्या भविष्यातील दृष्टिकोनाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
