गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणाऱ्या गुडलक कॅफेमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई-पुणे हायवेवरील फूड प्लाझामध्ये असलेल्या गुडलक कॅफेमध्ये अंडाभुर्जीच्या ताटात झुरळ सापडल्याची संतापजनक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेमध्ये बन मस्कामध्ये काच आढळून आली होती.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाने पुण्यातील एफ सी रोडरील शाखेचा परवाना तात्पुरता रद्द केला होता. अन्न आणि औषध प्रशासनाने गुडलक कॅफेला काही कृतींची पूर्तता करायला सांगितलं होतं. या त्रुटींची पूर्तता केल्यावरच परत कॅफे सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याआधीच गुडलक कॅफेच्या दुसऱ्या शाखेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई -पुणे हायवेवरील फूड प्लाझामध्ये झुरळ आढळल्याची घटना उघड झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. समाज माध्यमांवर देखील याबाबत जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. पुण्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या या हॉटेलमध्ये असे प्रकार आता समोर आल्याने त्यांची प्रतिमा खराब होत आहे. आता नवीन समोर आलेल्या प्रकारामुळे ग्राहकही आणखी नाराज झालेत.
