पाण्याच्या वॉलच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याने चालत असताना एका इसमाचा पाय घसरला आणि हा इसम थेट उघड्या असलेल्या पाण्याच्या वॉलच्या चेंबरमध्ये पडला. चेंबरमध्ये पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. आजूबाजूच्या लोकांनी या इसमाला उपचारासाठी डोंबिवलीमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान या इसमाचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे हे चेंबर नेमकं कोणी उघड ठेवलं, असा सवाल भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी उपस्थित केला. या संदर्भात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत एमआयडीसी प्रशासनाला देखील खडे बोल सुनावले आहेत.
निष्काळजीपणामुळे चव्हाण यांचा बळी गेला. आज आमचे वडील गेले उद्या कोणाच्या बाबतीत अशी घटना घडू नये आम्हाला न्याय पाहिजे अशी मागणी धर्मा चव्हाण यांच्या दोन्ही मुलांनी केली. हे चेंबर कायमच उघड असतं असा आरोप काशिनाथ चव्हाण आणि प्रवीण चव्हाण या त्यांच्या दोन्ही मुलांनी केला. या ठिकाणाहून अनेक गाड्या सुद्धा जात असतात उद्या कोणताही अनुचित प्रकार दुसऱ्याच्या घरी घडू नये अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. तर दुसरीकडे संतप्त नागरिकांनी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका या ठिकाणी मांडली आहे.
