कवठेमंकाळ तालुक्यातील अलकूड (एस) फाट्यावरील मोहन माळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण आणि निकृष्ट दर्जाचे जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जेवणात आळ्या, माश्या आणि मिक्सरचे ब्लेड सापडल्याच्या तक्रारींमुळे संतप्त पालकांनी गुरुवारी शाळेत गोंधळ घालत आपल्या मुलांना ताब्यात घेतले. शाळेचे संचालक मोहन माळी यांच्याविरोधात कवठेमंकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
विद्यार्थ्यांचा छळ, पालकांचा संताप
मुंबई आणि पुणे परिसरातील अनेक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांनी पालकांकडे केलेल्या तक्रारीनुसार, शाळेत निकृष्ट जेवण दिले जाते, तक्रार केल्यास शिवीगाळ आणि मारहाण केली जाते. यामुळे गुरुवारी दुपारी 22 पालक कवठेमंकाळ येथे दाखल झाले. त्यांनी प्रथम कवठेमंकाळ पोलीस ठाणे गाठून पोलिसांशी चर्चा केली आणि नंतर शाळेत धडक देत आपल्या मुलांना सुखरुप बाहेर काढले. पोलिसांनी गोंधळ टाळण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
मुंबईतील बांद्रा येथील रहिवासी विजय तुकाराम टिके यांनी आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, “माझा मुलगा विहान आठवीत शिकतो. दोन-तीन दिवसांपूर्वी पालकांची बैठक झाली, तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या. मुलांना रक्त येईपर्यंत मारहाण झाली. जेवणात किडे, माश्या आणि मिक्सरचे ब्लेड सापडले. पोटाचा आजार झाल्यावरही डॉक्टरांना दाखवले नाही.”
