कितीही मित्र-मैत्रिणी असले तरी आई-वडिलांपेक्षा जास्त काळजी कोणीही करत नाही. अर्थात, काही पालक आपण काळजी करतोय हे दाखवत नाहीत, पण कितीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवली तरी आई-वडील आपल्या मुलांची साथ सोडत नाहीत. त्यामुळे पालकांचा मृत्यू हा मानसिकदृष्ट्या अक्षरशः हादरवून टाकणारा असतो. अशा स्थितीत तुमची कंपनी किंवा तुमचा बॉस संवेदनशील असावा, अशी अपेक्षा असते.
पण, ज्या कंपनीसाठी तुम्ही दिवस-रात्र काम करताय, त्यांनी तुम्हाला साधी दोन दिवसांची सुट्टी द्यायलाही नकार दिला, तर तुम्ही काय म्हणाल? होय, असाच एक धक्कादायक अनुभव एका व्यक्तीने सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केला आहे. या व्यक्तीने आपल्या कंपनीबाबत अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वाचून तुम्हीसुद्धा संतापाने लाल व्हाल.
युझरने हा अनुभव एका रेडिट पोस्टद्वारे शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तो म्हणाला, “माझ्या वडिलांचं एका आठवड्यापूर्वी निधन झालं. वडील आजारी असताना मी ५ दिवसांची सुट्टी घेतली होती आणि आठवडाभर ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) घेतलं. कारण त्यावेळी वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण दुर्दैवाने माझ्या वडिलांचं निधन झालं. परिणामी, त्यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित क्रिया-कर्म करण्यासाठी मी आणखी काही दिवस सुट्टी मागितली. पण मॅनेजरने सुट्टी दिली नाही. उलट, अप्रत्यक्षरित्या ऑफिसमध्ये येऊन काम कर, असं त्याने मला सांगितलं.”r/IndianWorkplace या रेडिट पेजवरून @boombaa0 या युझरने सवाल केला आहे की, वडिलांच्या मृत्यूनंतर ३ दिवसांत ऑफिसमध्ये जाऊन काम करणं योग्य आहे का? या प्रश्नावर आता नेटकरी जोरदार प्रतिक्रिया देत कंपनीवर टीका करत आहेत. कोणी या युझरला ती कंपनी सोडून देण्याचा सल्ला देत आहे, तर कोणी हा प्रकार अमानुष असल्याचं म्हणत आहे.
पण वास्तविक विचार करता, गेल्या काही काळात मानवाने खरंच खूप प्रगती केली आहे. आपण तांत्रिकदृष्ट्या पुढे जात आहोत, पण आपल्यामधील माणुसकी मात्र हरवत चालली आहे की काय, असा प्रश्न वारंवार उभा राहत आहे. कारण माणसं पैशांच्या मागे पळण्यात इतकी व्यस्त झाली आहेत की, एखाद्याप्रती संवेदनशीलता व्यक्त करण्यासाठीसुद्धा वेळ नाहीये. आणि या प्रकरणामुळे माणूस म्हणून आपण नेमकं कुठे चाललो आहोत, ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
