ऑनलाइन गेमिंगसंदर्भातील जाहिरातींमध्ये आवर्जून सांगितली जाणारी गोष्ट म्हणजे या खेळाचं व्यसन लागू शकतं कृपया जपून खेळा. सर्वच कंपन्यांना ग्राहकांना ही सूचना देणं बंधनकारक आहे. मात्र यामुळे लोकांच्या वागण्यात काही विशेष फरक पडल्याचं दिसत नाही. याचप्रमाणे लहान मुलांना विरंगुळा म्हणून कायम त्यांच्या हातात आपला मोबाईल देऊन मोकळं होणारे पालकही अनेक आहेत. या दोघांनीही धडा घ्यावा असाच काहीसा प्रकार आता कोल्हापूरमध्ये समोर आला आहे.
सहावीत शिकणाऱ्या मुलाच्या हाती दिला मोबाईल अन्…
कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने म्हशी घेण्यासाठी सात लाख रुपये बँक खात्यात साठवले होते. मात्र सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या त्यांच्या मुलाने मोबाइलवर ‘फ्री फायर’ गेम खेळताना नकळत काही अॅप्लिकेशन्स घेतले आणि काही क्षणात बँक खात्यातील पाच लाखांची रक्कम गायब झाली. खात्यातील पैसे गेल्याच्या मेसेजमधील ट्रान्झेक्शन आयडीवरून सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला. बँक खात्याशी कनेक्ट असलेला मोबाइल नंबर लहान मुलांच्या हाती दिल्यानंतर काय होऊ शकते, याचा धडाच पालकांना मिळाला.
बँकेत गेले असता समोर आली धक्कादायक माहिती
राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने म्हशींचा गोठा करून चांगला जम बसवला आहे. नवरा-बायको दोघे काबाडकष्ट करून गोठा आणखी वाढविण्याच्या विचारात होते. यासाठी ते बँक खात्यात पैसे साठवत होते. मे महिन्यात ते गोठ्यातील म्हशींची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने हरयाणातून चार म्हशी आणणार होते. यासाठी बँकेत जाऊन पैशांची माहिती घेताच त्यांना धक्का बसला. बँक खात्यात फक्त दोन लाख रुपये शिल्लक होते. स्टेटमेंट काढल्यावर खात्यातून ऑनलाइन पैसे गेल्याचे लक्षात आले. बँकेने हात झटकून पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. अखेर शेतकऱ्याने सायबर पोलिस ठाणे गाठले,
डिजीटल शस्त्र खरेदीसाठी खर्च
बँकेतील स्टेटमेंटनुसार मोबाइलमधील मेसेज तपासले. मात्र, त्यात एकही मेसेज नव्हता. ट्रान्झेक्शन आयडीवरून शोध घेतल्यानंतर काही रक्कम ‘फ्री फायर गेम’मधील डिजीटल शस्त्र खरेदीसाठी गेल्याचे लक्षात आले. यापैकी बरीच रक्कम सायबर गुन्हेगारांनी छुप्या अॅपद्वारे मोबाइलचा ताबा घेऊन विविध खात्यांवर वळविल्याचे स्पष्ट झाले. हा सर्व प्रकार त्यांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाकडून नकळत घडल्याचं तपासामध्ये समोर आलं आहे. सायबर गुन्हा कसा झाला हे समोर आलं असलं तरी ही रक्कम रिकव्हर करणं कठीण मानलं जात आहे.
या प्रकरणामुळे पालकांनी आपला मोबाईल मुलांच्या हातात देण्याआधी अनेकदा विचार करावा असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे
