मुंबईत आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचं समोर आलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावरील मेट्रो वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे, मोनो रेल्वे मार्गावरील वाहतूकही एक तासाहून अधिक काळापासून ठप्प झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांची मोठी गैरसोई झाली असून प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे काही मेट्रो गाड्या उशिराने धावत आहे. सकाळच्या वेळी मेट्रो वाहतूक विस्कळीत झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकर प्रवाशांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. मेट्रो गाड्या उशिराने धावत असल्याने घटकोपर स्थानकावर मोठी गर्दी झाली. मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांची भलीमोठी रांग लागली होती. पावसामुळे आधीच प्रवासात अडचणी निर्माण होत असतानाच मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
