दोन व्यक्ती एकमेकांबद्दल प्रेमाची भावना व्यक्त करताना आय लव्ह यू शब्दाचा वापर करतात. पण तुम्ही कोणाला आय लव्ह यू म्हटलं आणि समोरच्या व्यक्तीने तुमच्यावर लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली तर? धक्का बसेल ना? अशाच एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिलाय. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोक्सो कायद्यांतर्गत एका पुरूषाची शिक्षा रद्द केली. ‘आय लव्ह यू’ म्हणणे ही केवळ भावना व्यक्त करणे आहे आणि ती स्वतः लैंगिक छळ नाही’, असे न्यायालयाने म्हटले. 2015 मध्ये एका किशोरवयीन मुलीची छेड काढल्यच्या आरोपाखाली 35 वर्षीय पुरूषाची न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली.
न्यायालयाने काय म्हटले?
कोणत्याही लैंगिक कृत्यामध्ये अनुचित स्पर्श करणे, जबरदस्तीने कपडे काढणे, अश्लील हावभाव किंवा महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करण्याच्या उद्देशाने केलेल्या टिप्पणीचा समावेश आहे, असे खटल्याची सुनावणी करताना खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे. यापूर्वी नागपूरमधील सत्र न्यायालयाने 2017 मध्ये त्या पुरूषाला भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत दोषी ठरवले होते. खंडपीठाने त्याला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली.
नेमकं काय आहे प्रकरण?
संबंधित पुरूषावर 17 वर्षांच्या मुलीला शाळेतून घरी जाताना त्रास देण्याचा आरोप होता. पुरुषाविरोधात दाखल तक्रारीनुसार, त्याने तिचा हात धरला आणि आय लव्ह यू म्हणाला. किशोरवयीन मुलगी घरी गेली आणि घडलेली घटना तिने तिच्या वडिलांना सांगितली. वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवला. हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि उच्च न्यायालयाने त्या पुरूषाची शिक्षा रद्द केली. मुलीचे लैंगिक छळ करण्याचा हेतू होता, असे कोणत्याही परिस्थितीत दिसून आले नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले.
‘आय लव्ह यू’ वर न्यायालयाने काय म्हटले?
आय लव्ह यू हा शब्द कायद्याने गृहीत धरल्याप्रमाणे स्वतःमध्ये लैंगिक हेतू दर्शवत नाही, असे न्यायालयाने म्हटले. आय लव्ह यू असे म्हणण्यामागील खरा हेतू लैंगिक कृतीमध्ये ओढण्याचा होता असे नाही. हा खटला छेडछाड किंवा लैंगिक छळाच्या कक्षेत येत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
आदेश काय म्हटलं?
जर कोणी असे म्हटले की तो दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा त्याच्या भावना व्यक्त करतो, तर तो स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारचा लैंगिक हेतू दर्शविण्याचा हेतू असणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलंय.
