अतिशय दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा काही दिवसांपूर्वीच खोवला गेला. निमित्त होतं ते म्हणजे शुभांशू शुक्ला यांची अंतराळवारी. भारताचे शुभांशू हे 14 दिवसांसाठी अंतराळवारीवर गेले असून, यासाठीसुद्धा त्यांचा विमा काढण्यात आला आहे.
अंतराळवीरांचाही विमा…
अंतराळवारीवर जाणाऱ्या अंतराळवीरांचा विमा साधारण 40 ते 160 कोटी रुपयांदरम्यान असतो. आतापर्यंत हा जगातील महागडा विमा असल्याचं म्हटलं जातं. इतकंच नव्हे, तर दुर्दैवानं अंतराळवारीदरम्यान एखादी दुर्घटना घडली असता विम्याच्या या रकमेवर काही प्रसंगी दावासुद्धा सांगण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे.
राहिला मुद्दा शुभांशू शुक्ला यांचा, तर ते इतर तीन देशांच्या अंतराळवीरांसह अंतराळवारीवर गेले असून, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथं त्यांचा 14 दिवसांचा मुक्काम असेल. NASA च्या एक्झिओम 4 या मोहिमेअंतर्गत त्यांना अंतराळात पाठवण्यात आलं आहे.
इतर अंतराळवीरांप्रमाणंच शुभांशू शुक्ला यांचाही विमा काढण्यात आला आहे. प्रत्यक्षात अंतराळवारी ही जोखमीची असल्यामुळं या मोहिमेत सहभागी असणाऱ्या व्यक्ती, अंतराळयान, त्यातील उपकरणं यांचाही विमा काढला जातो. ‘लॉयड्स ऑफ लंडन’ यांसारख्या विमा कंपन्या सहसा अंतराळ मोहिमा आणि त्यातील संभाव्य जोखमीची स्थिती पाहता त्यासाठीचा विमा काढतात.
दरम्यान एक्झिओम मोहिमेसाठी भारत शासनानं जी रक्कम दिली आहे त्यामध्ये मोहिमेच्या तयारीसाठीचा खर्च, सीटचा खर्च, प्रशिक्षण आणि विमा यांचाही समावेश आहे. एक्झिओम स्पेस आणि स्पेस एक्स सहसा त्यांच्या खासगी स्पेसफ्लाईट मोहिमांसाठी अंतराळात जाणाऱ्यांचा जीवन आणि अपघात विमा उतरवतात.
उपलब्ध माहितीनुसार Axiom मोहिमांमध्ये विम्याची रक्कम 42 कोटी ते 168 कोटींच्या घरात असते. यासाठी जवळपास 10 ते 20 टक्क्यांचं प्रिमियम दिलं जातं. म्हणजेच शुभांशू शुक्ला यांच्या सीटची किंमत $60M हून अधिक आहे या कारणानं त्यांचं विमान कवरेज याच आधारे निर्धारित केलं गेलं असू शकतं. म्हणजे ही रक्कम साधारण 150 ते 200 कोटींच्या घरात असू शकते असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या मोहिमेतील विम्याच्या रकमेची कोणतीही अधिकृत माहिती मात्र अद्यापही समोर आलेली नाही.
अंतराळवीरांच्या विम्यामध्ये मोहिमेदरम्यान (अपघाती) मृत्यू, प्रशिक्षण रद्द होणं, प्रशिक्षणादरम्यानची जोखिम, मोहिमेचा कालावधी या गोष्टी कवर असतात. लक्षात घ्टया, 60 च्या दशकामध्ये अपोलो मोहिमेसाठी नासानं अंतराळवीरांचा विमा काढला नव्हता. यासाठी अंतराळवीरांनी मोहिमेपूर्वी त्यांची स्वाक्षरी मागे सोडली होती. जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्या स्वाक्षरीच्य़ा बळावर कुटुंबाला पैसे मिळवता येतील.
