मुंबईमध्ये एका विचित्र प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने मयत व्यक्तीचे वीर्य गोठवण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे मयत मुलाच्या आईने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीदरम्यान न्यायलयाने हे आदेश दिले आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि न्यायालयाने यासंदर्भात काय म्हटलंय जाणून घेऊयात…
न्यायालयाने नक्की काय आदेश दिले?
मुंबईतील एका फर्टिलिटी सेंटरला उच्च न्यायालयाने एका मृत अविवाहित मुलाचे वीर्य पुढील आदेश देईपर्यंत गोठविण्याचे निर्देश दिलेत. या मुलाच्या आईने त्यांची वंशपरंपरा पुढे नेण्यासाठी या वीर्याचा वापर करायचा असल्याचं उच्च न्यायालयाला सांगितले आहे. या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरु असून त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने हे आदेश दिले.
वीर्य देण्यास फर्टिलिटी सेंटरचा नकार कशामुळे?
संबंधित फर्टिलिटी सेंटरने मयत व्यक्तीचे वीर्य त्याच्या आईला देण्यास नकार दिल्यानंतर तिने न्यायालयात धाव घेतली. संबंधित व्यक्तीने उपचार घेत असताना दिलेल्या संमतीपत्रात मृत्यूनंतर वीर्य नष्ट करण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे. त्याला कॅन्सर झाल्याने किमोथेरेपीचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन त्याने वीर्य गोठविण्याचा निर्णय घेतला होता. जर मृताच्या गोठविलेल्या वीर्याची याचिकेवरील निर्णयाच्या आत विल्हेवाट लावली तर ते निष्फळ ठरेल, असे म्हणत न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी पुढील सुनावणी 30 जुलै रोजी ठेवली आहे.
या प्रश्नांसंदर्भात दिला जाणार निकाल
जोपर्यंत ही याचिका प्रलंबित आहे तोपर्यंत फर्टिलिटी सेंटरने मृत व्यक्तीचे गोठविलेले वीर्य सुरक्षित ठेवावे आणि त्याची योग्यरीत्या साठवणूक करावी. विशेषतः एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे वीर्य साठवणुकीच्या आणि वापराच्या बाबतीत विशिष्ट नियम आहेत आणि संमतीनुसारच त्याचा वापर होऊ शकतो का? यासंबंधी सविस्तर सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने म्हटले.
नेमकं हे प्रकरण काय आहे?
या प्रकरणातील फेब्रुवारीत मृत्यू झाला, तेव्हा तो अविवाहित होता. मृत्यूनंतर आईने मुंबईतील फर्टिलिटी सेंटरकडे गुजरातमधील आयव्हीएफ केंद्रात मुलाचे वीर्य हस्तांतरित करण्याची परवानगी मागितली. आईच्या म्हणण्यानुसार, मुलाने कोणाशी सल्लामसलत न करता त्याच्या संमतीपत्रात वीर्याची विल्हेवाट लावण्यास सहमती दर्शविली होती. त्यामुळेच आता मुलाच्या मृत्यूनंतर आपला वंश कायम रहावा यासाठी आपल्याला हे वीर्य हवे असून ते गुजरातमधील आयव्हीएफ केंद्राकडे दिलं जावं असं या महिलेचं म्हणणं होतं.
फर्टिलिटी सेंटरने मयत व्यक्तीने संमतीपत्राचा हवाला देत हे वीर्य आईच्या मागणीनुसार गुजरातमधील केंद्रात पाठवण्यास नकार दिल्याने प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. आता न्यायालय आईचं म्हणणं ऐकणार की मयत व्यक्तीचं संमतीपत्रच सर्वोच्च असल्याचं ग्राह्य धरणार हे 30 तारखेच्या निकालामधून स्पष्ट होईल.