मुलीने वारसा हक्कावरून वडिलांचा अपमान केल्याने लष्करातून निवृत्त झालेले जवान एस विजयन यांनी थेट हा अपमान सहन न झाल्याने त्यांच्याजवळ असणारी 4 कोटी रुपयांची संपत्ती ही एका मंदिराला दान केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील अरुलमिगु रेनुगांबल अस्मान मंदिराला त्यांनी ही देणगी दिली आहे. मुलीने केलेला अपमान सहन न झाल्याने वडिलांनी घेतलेला हा निर्णय पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
यामध्ये वडिलांनी मुलीने वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्याचा आणि दुखावल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. याआधी त्यांचे मुलीसोबत वारसा हक्कावरून अनेकदा वाद देखील झाले होते. मात्र, वडिलांनी रागाच्या भरता ही संपत्ती मंदिराला दान केली. त्यानंतर आता कुटुंबियांकडून ही संपत्ती परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
निवृत्त लष्करी जवान विजयन हे अराणी शहराजवळ असणाऱ्या केशवपुरम या गावातील रहिवाशी आहेत. ते त्यांच्याकडे असणाऱ्या दोन मालमत्तांची कागदपत्रे घेऊन मंदिरात गेले होते. यामध्ये मंदिराजवळ असणाऱ्या एक मालमत्ता ही 3 कोटींची असून दुसरी मालमत्ता ही 1 कोटी रुपयांची आहे. मंदिरातील कर्मचाऱ्यांनी 24 जून रोजी दानपेटी उघडली असता त्यांना या दानपेटीत 4 कोटी रुपये किंमतीच्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे यामध्ये मिळाली.
काय म्हणाले मंदिर प्रशासन?
मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांने सांगितले की, दर दोन महिन्यांनी आम्ही दानपेटी उघडून भाविकांनी दिलेले दान मोजतो. ही आमची नियमित परंपरा आहे. मंदिरात एकूण 11 दान पेट्या आहेत. अशाच एका मोजणीवेळी त्यांनी मंदिराच्या समोरच्या बाजुला ठेवण्यात आलेल्या दानपेटी उघडली असता त्यांना यामध्ये नाणे आणि नोटांसोबतच मालमत्तेची मूळ कागदपत्रे मिळाली. त्यांना ही कागदपत्रे पाहून धक्का बसला.
या कागदपत्रांसोबत यामध्ये एक चिठ्ठी देखील त्यांना सापडली. ज्यामध्ये ते स्वच्छेने ही संपत्ती मंदिराला दान करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, त्या ठिकाणी अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, असे कागदपत्रे दानपेटीत टाकून संपत्ती आपोआप मंदिराची होत नाही. जर दान करायचे असेल तर त्यांनी अधिकृतपणे विभागाकडे नोंदणी करावी.