फरीदाबादच्या नवीन नगर परिसरातील तनुच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी आता सासऱ्यानंतर सासूलाही अटक केली आहे. पोलिसांनी सर्वात आधी सासरा भूप सिंहला अटक केली होती. यानंतर आता क्राइम ब्रांचने सासू सोनियालाही अटक केली आहे. दरम्यान तनुचा पती अरुण अद्याप फरार आहे.
मूळ उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद येथील रहिवासी असलेली तनु हिचे लग्न दोन वर्षांपेक्षा कमी काळापूर्वी फरीदाबादच्या रोशन नगर येथील अरुण सिंगशी झाले होते. शुक्रवारी सकाळी तिचा कुजलेला मृतदेह सिंग कुटुंबाच्या घराबाहेर असलेल्या सार्वजनिक रस्त्यावरील 10 फूट खोल खड्ड्यातून सापडला. तिच्या बेपत्ता झाल्यानंतर काही वेळातच टाकण्यात आलेल्या काँक्रीट स्लॅबखाली हा मृतदेह आढळला.
पोलिसांना 20 जूनला तनुचा मृतदेह सापडला होता. तनुची हत्या 21 एप्रिल रोजी करण्यात आली होती. दरम्यान कोणालाही शंका येऊ नये यासाठी सासरे भूप सिंह यांनी पोलीस ठाण्यात तनु बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी दोन महिने काहीच कारवाई केली नाही. यानंतर तनुच्या नातेवाईकांनी डीसीपी उषा कुंडू यांची भेट घेत न्याय देण्याची मागणी केली होती.
भूप सिंगने 25 एप्रिल रोजी तक्रार दाखल करत तनु गायब झाल्याचा दावा केला. त्यानंतर काही आठवडे त्याने ती बाजारात गेली असल्याचं सांगितलं. तनुची बहीण प्रीती हिने तिच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय वाढला.
प्रीती म्हणाली की तिच्या बहिणीला लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून हुंड्यावरून छळ सहन करावा लागत होता. तिने सांगितले की जुलै 2023 मध्ये लग्नाच्या काही महिन्यांतच तनु तिच्या माहेरी परतली आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ तिथे राहिली. “लग्नानंतर काही महिन्यांनीच तनु आमच्या माहेरी राहायला आली. तिला तिथे चांगली वागणूक मिळत नव्हती,” असं प्रीतीने पत्रकारांना सांगितले. “ती एक वर्षापेक्षा जास्त काळ आमच्यासोबत राहिली. शेवटी आम्ही तिला परत पाठवले तेव्हा छळ पुन्हा सुरू झाला. ते तिला आमच्याशी बोलू देत नव्हते, अगदी फोनवरही नाही,” अशी माहिती तिने दिली आहे.
शेजाऱ्यांनी सांगितले की, 23 एप्रिल रोजी त्यांनी घराबाहेर मजूर पाहिला. अरुण सिंग आणि भूप सिंग यांनी ड्रेनेज बांधकामाच्या बहाण्याने सुमारे 10 फूट खोल खड्डा खोदला. दोन दिवसांनी, 25 एप्रिल रोजी, भूप सिंग तनुच्या बेपत्तातेची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांकडे गेला.
सासऱ्यानंतर सासूलाही अटक
डीसीपींनी दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी खड्डा खोदला असता त्यात तनुचा मृतदेह आढळला. सुरुवातीला सासऱ्याला आरोपी करण्यात आलं. पण तनुच्या कुटुंबीयांचं यावर समाधान झालं नाही. त्यांनी तपास पोलिसांकडून काढून घेण्याची मागणी केली. यानंतर डीएलएफ क्राइम ब्रांचकडे प्रकरण सोपवण्यात आलं.
आरोपी पतीचा शोध सुरु
तपासात समोर आलं आहे की, तनुच्या हत्येची आधीच योजना आखण्यात आली होती. सासूला त्यासाठी माहेरी पाठवण्यात आलं होतं. त्या रात्री तनु आणि तिच्या बहिणीला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. यानंतर सासरा भूप सिंहने आधी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह घराजवळी खड्ड्यात पुरण्यात आला होता. क्राइम ब्रांचला सासूदेखील या योजनेत सहभागी असल्याचं आढळल्यानंतर तिलाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान पती अरुणचा शोध घेतला जात आहे.