पंजाब, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगाल या चार राज्यातील विधानसभेच्या पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. या पोटनिवडणुकीत आतापर्यंतच्या अपडेटनुसार गुजरातमधील दोन पैकी एका जागेवर भाजपनं आणि एका जागेवर आपनं विजय मिळवला आहे. केरळमधील जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे.तर, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. आम आदमी पार्टीच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची जागा असलेल्या पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात देखील आपचा उमेदवार आघाडीवर असून त्यांच्या विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. आपला गुजरातमधील विसावदार जागेवर विजय मिळाला आहे. तर लुधियाना पश्चिममधील संजय अरोरा यांचा विजय निश्चित मानला जातोय. आपचे उमेदवार संजय अरोरा हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. ते विधानसभेत आमदार झाल्यास त्यांच्या जागी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
पश्चिम लुधियानात आप आघाडीवर
पश्चिम लुधियानात आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत झाली. पश्चिम लुधियानातील या तिरंगी लढतीत आपचे उमेदवार संजीव अरोरा यांनी 14 फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर 35719 मतं मिळवली आहेत. तर, काँग्रेसच्या भारत अशू यांना 24542 मतं मिळालीत. भाजपच्या जीवन गुप्ता यांना 20323 मतं मिळाली आहेत. या जागेवरुन आपचा विजय निश्चित आहे.
पश्चि लुधियानातील आपचे उमेदवार संजीव अरोरा हे राज्यसभा खासदार आहेत. ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होईल. अरोरांच्या रिक्त होणाऱ्या जागेवरुन आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल राज्यसभेचे सदस्य होतील, अशा चर्चा आहेत. अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.
भाजपनं गुजरातच्या कडी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. पाच पैकी या एका जागेवर भाजपला यश मिळालं आहे. भाजपचे राजेंद्रकुमार छावडा हे या जागेवर विजयी झाले.
केरळमधील निलाम्बूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि माकप यांच्यात लढत होती. या ठिकाणची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेसचे आर्यदन शौकत हे 11077 मतांनी आघाडीवर आहेत.
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी कालिगंज विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत टीएमसीच्या आलिफा अहमद यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या ठिकाणी देखील तिरंगी लढत झाली. मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या तुलनेत टीएमसीच्या अलिफा अहमद यांनी मोठी आघाडी घेतली आहे. अलिफा अहमद 17 व्या फेरीअखेर 48 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत.