नवरात्रीनिमित्त सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना शुल्क भरावा लागणार आहे. गडावर पायी येणाऱ्या भाविकांवर प्रत्येकी दोन रुपयांचा यात्रा कर आकारण्याचा अजब निर्णय सप्तश्रुंगी गड ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ रस्त्यावरच्या वाहनांकडून वसुल केला जाणारा टोल, आता पायी येणाऱ्या भाविकांकडूनही वसूल केला जाण्याची शक्यता आहे.
सप्तश्रुंगी गड ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाला पंचायत समितीनेही हिरवा कंदील दाखवला आहे. दरवर्षी एक कोटीहून अधिक भाविक गडावर देवीच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांच्या दान आणि देणग्यांतून सप्तश्रुंगी मंदिर ट्रस्टला वर्षाकाठी 15 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळतं.
मात्र तरीही भाविकांकडून यात्रा कर वसूल का करायचा, असा प्रश्न विचारल्यावर पंचायतीन कर वसुलीचं खापर ट्रस्टवर फोडलं आहे. उत्पन्न ट्रस्टला आणि खर्च ग्रामपंचायतने करायचा, हे कसं चालणार?, असा सवाल ग्रामपंचायतीने केला आहे. सहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेली ग्रामपंचायत भाविकांना सुविधा कशा पुरवणार असा प्रश्न करत पंचायतीनं या करवसुलीचं समर्थन केलं आहे.

