व्यापाऱ्याच्या घरातून 35 लाखांचे दागिने आणि रोलेक्स घड्याळ चोरीला, रोज अवतीभोवतीच फिरत होता चोर; नाव ऐकून चक्रावले

मुंबईतील उच्चभ्रू वस्ती असणारा परिसर म्हणून कुलाब्याची ओळख आहे. कुलाब्यात अनेक कलाकार, राजकारणी आणि मोठ्या व्यापाऱ्यांची घरे आहेत. कुलाबा येथील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. व्यापाऱ्याच्या घरातून 35 लाख रुपयांच्या हिऱ्याचे कानातले आणि रोलेक्स घड्याळाची चोरी झाली आहे. प्रदीन सनत शाह असं या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांना शाह यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संशय आहे.

1 जून ते 13 जून या दरम्यान व्यापाऱ्याच्या घरात चोरी करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही घटना १ जून ते १३ जून दरम्यान घडली, जेव्हा शाह आणि त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत लंडनमध्ये सुट्टीवर गेले होते. 1 जून रोजी शाह यांच्या पत्नीने त्यांचे विंटेज डायमंड कानातले (सुमारे 20 लाख रुपये किमतीचे) आणि सोन्याचे रोलेक्स घड्याळ (सुमारे 15 लाख रुपये किमतीचे) बेडरूमच्या वॉर्डरोबमध्ये एका ड्रॉवरमध्ये ठेवले होते. दुसऱ्या दिवशी शाह कामावर गेले आणि त्यांची पत्नी दिवसभर बाहेर गेली होती. मात्र या काळात बेडरूमचा दरवाजा उघडाच होता आणि वॉर्डरोबची चावीदेखील घरातच राहिली होती.

शाह हे त्यांच्या कुटुंबासह लंडन येथे गेले. त्यानंतर 13 जून रोजी ते घरी परतले. तेव्हा त्यांना घरी सगळे व्यवस्थित असल्याचेच जाणवले. मात्र रात्री उशिरा त्यांनी वॉर्डरोब उघडले तेव्हा हिऱ्यांचे कानातले आणि रॉलेक्स घड्याळ गायब होते. त्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघड झाले. त्यानंतर शाह कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

शाह यांचा छपाई यंत्रसामग्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या कारखान्यात सात ते आठ जण काम करतात. त्यांच्या कारखान्यातील कर्मचारी न सांगता रजेवर गेले आहेत. त्यामुळं पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला आहे. कुलाबा पोलिसांनी सात कर्मचारी आणि मॅनेजरलाविरोधात एफआयआर दाखल केली आहे. तसंच, चोरी झालेल्या वस्तू शोधण्यासाठी आणि गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *