पुण्यातील भोरमध्ये भीषण अपघात, ओव्हरटेक करणं बेतलं जीवावर, एकुलता एक शुभम जागीच गतप्राण

पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील माळवाडी फाटा येथे अपघात झाला. या अपघातामध्ये शुभम पवार या तरूणाचा मृत्यू झाला. कारला समोरून जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शुभम पवार जागीच ठार झाला, तर सहप्रवासी जखमी झाला आहे. भोर-कापूरहोळ रस्त्यावरील माळवाडी फाट्याजवळ मगंळवारी सकाळी सव्वाआकराच्या सुमारास ही घटना घडली. मृत्यू झालेल्या शुभम आणि ज्यांच्या गाडी धडकली त्या धावलेंचे गाव अगदी काही अंतरावरच आहे. एकुलता एक असलेल्या शुभमच्या अपघाती मृत्यूने पवार कुटंबावर दु:खाचा डोंगर कोसलळा आहे.

शुभम राजेंद्र पवार (वय २६, रा. आळंदे, ता. भोर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे, तर कुणाल जालिंदर खोपडे (वय २४) असे जखमी झालेल्याचे नाव असून, त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पंढरीनाथ केशव धावले (रा. तेलवडी, ता. भोर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत सचिन जगन्नाथ पवार यांनी फिर्याद दिली.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, धावले मारुती वॅगनार कार घेऊन भोरच्या दिशेने येत होते. दरम्यान, एका छोट्या मालवाहू टेम्पोला ओव्हरटेक करून समोरून आलेली दुचाकी कारवर आदळली. त्यामुळे शुभम उडून रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला, छातीला गंभीर मार लागला, तर कुणाल गंभीर जखमी झाला. कारच्या पुढच्या बाजूचे पूर्ण नुकसान झाले असून, पाठीमागच्या काचादेखील फुटल्या आहेत.

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या शुभमला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शुभम एका खासगी कंपनीत काम करीत होता. आई-वडिलांना तो एकुलता एक मुलगा होता. शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. राजगड पोलिसांकडून पुढील तपास सुरू दिलेल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *