शात सर्वाधिक टोल टॅक्स भरणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल पाच राज्यांपैकी एक असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी पाचशे ते हजार कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. टोल वसुलीच्या बाबतीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. महाराष्ट्रातील लोकांनी 21,105 कोटींचा टोल टॅक्स भरला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही टोलची रक्कम वाढतीच
केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग बांधण्यावर आलेला खर्च वसूल झाल्यानंतर टोल टॅक्स घेता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यानंतरही टोल टॅक्स वसुलीची रक्कम दरवर्षी पाचशे ते हजार कोटींनी वाढत आहे.
वर्षानुवर्षे वाढत चाललीय टोल वसुलीची रक्कम
टोल वसुलीची रक्कम दरवर्षी वाढत आहे. 2020-21 मध्ये टोल नाक्याचे उत्पन्न 27,936 कोटी रुपये होते. 2021-22 मध्ये यात 6002 कोटी, 2022-23 मध्ये 14,104 कोटी आणि 2023-24 मध्ये 7850 कोटी रुपयांचा टोल वसूल केला. 2024-25 (फेब्रुवारी 25) पर्यंत 54,820 कोटींचा एकूण टोल वसूल केला गेला.
सर्वाधिक टोल भरणारी राज्यं कोणती?
2020-21 ते 2024-25 (फेब्रुवारी 25 पर्यंत) या मागील पाच वर्षांत देशात 2 लाख 20 हजार 590 कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातून 27 हजार 14 कोटी रुपयांचा टोल वसूल केला गेला. यानंतर राजस्थानमधून 24,209 कोटी, महाराष्ट्रातून 21,105 कोटी आणि गुजरातमधून 20,607 कोटींची टोल वसुली झाली.
महाराष्ट्रात किती टोल नाके?
महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावर 75 पेक्षा जास्त टोल नाके आहेत. मागील पाच वर्षांत मराठी माणसाने 21,105 कोटी 18 लाख रुपयांचा टोल दिला आहे. महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपासून टोलचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारने मुंबईच्या वेशीवरील टोल नाक्यांवरुन लहान वाहनांना वगळण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहनांची ये-जा फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच या शहरांमधून मोठ्या प्रमाणात टोल जमा होतो.
कोणत्या वर्षी महाराष्ट्राने किती टोल भरला?
मागील पाच वर्षांमधील महाराष्ट्रातील टोल वसुली (फेब्रुवारी 2025 पर्यंत) खालीलप्रमाणे
2020-21 — 2590.85 कोटी रुपये
2021-22— 3386.21 कोटी रुपये
2022-23– 4660.21 कोटी रुपये
2023-24– 5352.53 कोटी रुपये
2024-25 — 5115.38 कोटी रुपये