बोपदेव घाटात तरुणाकडून 28 हजारांची खंडणी उकळली, पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याचे खात्यातून निलंबन

पोलिसानेच 28 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पुणे पोलिसांच्या प्रतिमेला डाग लागल्याची चर्चा आहे. पुण्यातील बोपदेव घाटात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यातील पोलिसावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रम लक्ष्मण वडतीले असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तो कोंढवा पोलीस ठाण्यात तैनात होता. एका तरुणाच्या बॅगेत हुक्का पॉट आढळल्यानंतर, कारवाई करण्याची धमकी देत या पोलीस कर्मचाऱ्याने 28 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होताच कर्मचाऱ्याला पोलिस खात्यातून निलंबित देखील करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार तरुण हा चेन्नई येथील राहणारा आहे. तो त्याच्या मित्रासह पुण्यातील प्रसिद्ध बोपदेव घाट परिसरात फिरण्यासाठी आला होता. यावेळी त्याच्या बॅगेत हुक्का पॉट आढळला होता.

यावेळी पोलीस कर्मचारी विक्रम वडतीले याने तरुणाला कारवाई करण्याची भीती घालत सुरुवातीला तीस हजार रुपये मागितले होते. त्यानंतर आपला मित्र केदार जाधव याच्या गुगल पे वरती 28 हजार रुपये स्वीकारले.

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर , तरुणाने कोंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुन्हा दाखल होताच कर्मचाऱ्याला पोलिस खात्यातून निलंबित देखील करण्यात आले आहे.

शिवम आंदेकरसह सहा जणांवर गुन्हा

दुसरीकडे, पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील मासेविक्री व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवम आंदेकरसह सहा जणांवर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शिवम आंदेकरला ताब्यात घेण्यात आले असून, अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *