विकत घेतलेली वस्तू परत घेण्यास नकार दिल्याने 15 वर्षाच्या तरुणीने दुकानदारावर ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. कृष्णकुंज परिसरात हे दुकान आहे. दुकानाच्या आत तरुणीने केलेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी त्यांच्या दुकानातून सामान विकत घेत असे. एखादी वस्तू काही दिवस वापरल्यानंतर ती पुन्हा दुकानात येऊन ती परत घेण्याच आग्रह करत असे. तसंच ही वस्तू परत घेऊन त्याचे पैसे परत मागायची. तिने यापूर्वी अनेकदा असं केलं होतं. पण यावेळी आपण तिला पैसे परत देण्यास नकार दिला.
दुकानदाराने वस्तू परत घेण्यास नकार दिल्यानंतर मुलीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तिने त्याला शिवीगाळही केली. अखेर काही वेळाने तिने ब्लेड बाहेर काढलं आणि दुकानदारावर त्याच्याने हल्ला केला. दुकानदाराला मुलगी अचानक असा काही हल्ला करेल याची कल्पना नव्हती. मुलीने केलेल्या हल्ल्यात दुकानदाराचा हात आणि पोटाला जखमा झाल्या आहेत.
मुलीने हल्ला केला तेव्हा तिने दोन महिला आणि दोन पुरुष उपस्थित होते. मुलीने हल्ला केल्यानंतर चौघेही तिच्या दिशेने दुकानबाहेर धावत गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दुकानदाराच्या कुटुंबाने मुलीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखलल केली आहे. यानंतर तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान परिसरातील रहिवाशांनी मुलीची मानसिक स्थिती योग्य नसून तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती दिली