लातूर बार्शी रस्त्यावर भीषण अपघात

लातूर तालुक्यातील बोरगाव काळे ते मुरूड अकोला रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पर्यायी रस्ता अत्यंत खड्डेयुक्त आहे. पाऊस झाल्यानंतर रस्त्यावर गाळ होतो. याच खराब रस्त्यामुळे कराड- लातूर ही एसटी बस पलटी झाल्याची घटना काल (४ जून) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रामेगावजवळ घडली. बसचा वेग कमी असल्यामुळे आतील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही. जखमींना तत्काळ लातूरला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कराड-लातूर ही बस (एम एच १४ बी टी ४४३२) लातूर तालुक्यातील मुरूड बस स्थानकातून रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास लातूरकडे निघाली. दरम्यान, रामेगाव-मुरुड अकोलाच्यामध्ये पीरदर्ग्याजवळ ती पलटी झाली. पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर पूर्ण चिखल झाला आहे. त्याचप्रमाणे चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. वाहनांसाठी बनविण्यात आलेला पर्यायी रस्ता अतिशय खराब आहे. त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अपघातस्थळ नवीन रस्ता होत असलेल्या जुन्या रस्त्यापेक्षा तीन फूट खोलवर आहे. रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे बस जुन्या रोडवरून खड्यातील नवीन रस्त्यावर पलटी झाली.

लातूर टेंभुर्णी महामार्ग हा मागील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. या महामार्गाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या हिरवा कंदील दाखवला व त्याला लागणारा निधीही देण्यात आला. मात्र बऱ्याच वर्षांपासून या महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली नाही. अर्धवट झालेल्या कामामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लातूर-मुरुड दररोज येणाऱ्यांची संख्या ही हजारोंच्या घरात आहे. यामध्ये रस्त्याची रुंदी कमी झाल्यामुळे रात्रीच्या वेळी दररोज एक तरी अपघात घडतो. यामुळे स्थानिकांकडून लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी स्वरूपाची मागणी करण्यात येते आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *