गलेलठ्ठ पगार तरीही मोह सुटेना! 2652 सरकारी कर्मचारी निघाल्या ‘लाडकी बहीण’, सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण. लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केला होता. लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी केल्यानंतर अनेक महिला अपात्र असतानाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. मात्र आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर 1.20 लाख महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेला लाभ घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते. तरीही महिला कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले तसंच योजनेचा लाभही घेतला आहे. यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने 1 लाख 60 हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिला. सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदविलेली होती. त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात 2652 महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले. त्यांनी ऑगस्ट 2024 पासून एप्रिलपर्यंत म्हणजे 9 महिन्यांत प्रत्येकी 13 हजार 500 रुपये घेतले. याचा अर्थ 3 कोटी 58 लाखांची कमाई त्यांनी केली असल्याचे समोर आले आहे.

सरकार करणार वसुली

ज्या 2,652 महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा गैरफायदा घेतला त्यांच्याकडून आता या रकमेची म्हणजेच 3 कोटी 51 लाख रुपयांची वसुली करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाला त्या बाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *