तीन पत्तीच्या नादात पावणे तीन कोटी गमावले; मुंबईतील व्यापाऱ्यासोबत घडला विचित्र प्रकार

‘ऑनलाइन गेमिंगमध्ये आर्थिक जोखीम होण्याची शक्यता असते. कृपया जबाबदारीने खेळा’, हे वाक्य तुम्ही अनेकदा जाहिरातींमध्ये ऐकलं असेल. ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकजण कायमचे उद्धवस्त होतात. त्यामुळेच जाहिरातीच्या शेवटी हा इशारा देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. अशाप्रकारे ऑनलाइन गेमच्या नादी लागून आर्थिक डबघाईला आल्याची अनेक प्रकरण यापूर्वी समोर आली आहे. असाच एक प्रकार आता नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे घडला आहे.

कोपरखैरणेमध्ये घडला विचित्र प्रकार

नवी मुंबईतील कोपरखैरणेमधील रहिवासी सुनीलकुमार सिंह या व्यावसायिकासोबत हा सारा प्रकार घडला आहे. सुनीलकुमार सिंहला ऑनलाईन गेमिंग साईटवर तीन पत्ती आणि कसीनोसारखे गेम खेळणे चांगलेच महागात पडलं आहे. सुनीलकुमार सिंहला ‘सॅट स्पोर्ट डॉट कॉम’ या ऑनलाईन गेमिंग साईटवर तीन पत्ती आणि कसीनो खेळायचे व्यसन लागले होते. यामध्ये सिंह कधी मोठी रक्कम जिंकायचा तर कधी हरायचा. यावेळी अधिक नफा मिळवण्याच्या नादात सिंहने तब्बल 3 कोटी 24 लाख 84 हजार इतकी रक्कम डिपॉजिट म्हणून भरली होती.

पावणे तीन कोटी अडकले

मात्र गेम खेळता खेळता सुनीलकुमार सिंहने पावणे तीन कोटी रुपये कधी गमावले त्याला समजलंही नाही. केवळ 50 लाख इतकी रक्कम सुनीलकुमारला काढता आली. सुनीलकुमार सिंहने 2 कोटी 74 लाख रुपये काढण्याचा विचार केला. मात्र ही रक्कम निघत नव्हती तसेच त्याचे गेमिंग अकाउंट देखील दिसत नव्हते. यावेळी सायबर चोरट्यांकडून 2 कोटी 74 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

पोलिसांनी दाखल करुन घेतला गुन्हा

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सुनीलकुमार सिंहने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ‘सॅट स्पोर्ट डॉट कॉम’ या ऑनलाईन गेमिंग वेबसाईटविरोधात आणि सुनीलकुमार सिंहला फोन करुन रक्कम भरण्यास सांगणाऱ्या व्हॉट्सअप क्रमांकाविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर गेमिंग साईट आणि संपर्क करणारे व्हाट्सअप क्रमांक हे परदेशातील असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले असून पोलिसांनी कुठल्याही गेमिंग साईटच्या आहारी न जाण्याचे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *