‘पाकिस्तानचा जम्मू काश्मीरवर ड्रोन हल्ला’, ‘पंजाबमध्ये ड्रोन दिसल्याने ब्लॅकआऊट करण्यात आला आहे’ अशा बातम्या गेल्या काही दिवसांत क्षणाक्षणाला धडकत असल्याने मुंबईत ड्रोनसाठी ‘रेड झोन जारी करण्यात आला आहे. मात्र तरीही विनापरवानगी मुंबईच्या आकाशात ड्रोनच्या घिरट्या पाहून मुंबईकर धास्तावले आहेत. त्यामुळे पोलिसांनी ड्रोन उडवून घबराट पसविणाऱ्यांवर तसेच, बंदी आदेश धुडकावून बिनधास्त ड्रोनचा वापर करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे ड्रोनची दहशत सर्वांच्या मनात आहे. मुंबईत मोठमोठ्या इमारती असल्याने मुंबईला ड्रोन हल्ल्याचा अधिक धोका आहे. त्यामुळे मुंबईत पोलिसांकडून ड्रोन, पॅराशूट, पॅराग्लायडिंग या सर्वावर बंदी घालण्यात आली आहे तरीही मुंबईत विनापरवानगी ड्रोन उडविले जात आहेत. आठवड्याभरात पोलिसांनी ड्रोन उडविणाऱ्यांवर आठ ते दहा गुन्हें दाखल केले आहेत. या बंदीमुळे प्री वेडिंग तसेच, लग्न सोहळ्यातील ड्रोन शूटिंग अडचणीत आले आहे. पोलिसांची बंदी घुडकावून असे चित्रिकरण करणाऱ्या ड्रोन ऑपरेटरवरही गुन्हे दाखल केले जात आहेत.
नादुरुस्त ड्रोनची चाचणी
पवई परिसरात ड्रोनची चाचणी अयशस्वी झाली आणि तो खाली पडल्याने संबंधित सोसायटीतील अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. घाबरलेल्या रहिवाशांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पवई पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, मूळचा हैद्राबाद येथील तरुण दुरुस्त करून आणलेल्या ड्रोनची चाचणी करीत होता, असे समजले, पोलिसांनी त्याच्याकडील ड्रोन ताब्यात देऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
विनापरवानगी चित्रिकरण
गोरेगाव लिंक रोडवर विनापरवानगी ड्रोन उडविणाऱ्या हरिष सोलंकी या ड्रोन ऑपरेटरला मुलुंड आणि भांडुप पोलिसांनी शोधून काढले. हरिष याच्याकडे स्वतःच्या मालकीचा ड्रोन असून तो ऑर्डरनुसार ड्रोनद्वारे चित्रिकरण करत असल्याचे कळले. मात्र यासाठी त्याने कोणतीही परवानगी न घेतल्याने मुलुंड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ड्रोन जप्त केले.
विवाह सोहळ्यात पोलिस पाहुणे
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील फटका मैदानात एक विवाह सोहळा सुरू होता. त्याचवेळी एक ड्रोन मैदानात वर भिरभिरताना पोलिसांच्या नजरेस पडले. आधीच युद्धजन्य परिस्थिती आणि त्यात ड्रोन नजरेस पडल्याने पोलिसही पोहोचले, मग लग्नाच्या मंडपात. ड्रोनद्वारे चित्रीकरण करणाऱ्याला पोलिसांनी हटकले तर ड्रोन उडवण्याची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे त्याने सांगितले. मुंबईत ड्रोन उडविण्यास बंदी असताना अशाच प्रकारे कृत्य म्हणजे शासकीय आदेशाचे उल्लंघन असल्याने पोलिसांनी ड्रोन ऑपरेटरवर गुन्हा दाखल केला.
