चितळे डेअरी आणि गोकुळ दूध संघापाठोपाठ पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज) दूध विक्री दरांत दोन रुपयांनी वाढ केली आहे. म्हशीचे दूध ७२ रुपयांवरून ७४ रुपये; तसेच प्रमाणित दूध ६२ रुपयांवरून ६४ रुपये करण्यात आले आहे. ही दरवाढ आज, बुधवारपासून लागू झाली आहे.
कात्रज येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर चितळे डेअरी आणि गोकुळ दूध संघाने दुधाच्या दरांत दोन रुपयांनी वाढ केली. महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे संघटनेने म्हणणे आहे.
‘दूध संघाच्या खरेदी दरांत तसेच वाहतूक आणि इतर खर्चात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढवण्यात आले आहेत,’ असे कात्रज दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी सांगितले. गायीचे दूध ५६ रुपयांवरून ५८ रुपये आणि म्हशीचे दूध ७२ रुपयांवरून ७४ रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे.
