महिलांना घेऊन देवदर्शनासाठी उज्जैनला निघालेली खासगी प्रवासी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जण मृत्युमुखी पडले. हा अपघात रविवारी पहाटे अडीचच्या दरम्यान फलटण तालुक्यातील सालपे येथील बिरोबा मंदिरासमोर झाला.
अपघातात बसचा चालक सलमान इम्तियाज सय्यद (वय २४, रा. मालबाग पाटील गल्ली, शिरढोण, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), रजनी संजय दुर्गुळे (४८, रा. पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर तेरा जखमींना लोणंदच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी इचलकरंजी, वडगाव व कोडोली येथील आहेत.
इचलकरंजी येथील ही खासगी प्रवासी बस ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशनमार्गे सालपे घाट उतरून लोणंदकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. ती बिरोबा मंदिराजवळ आली असता लोणंदकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक समोरून आला असता दोन्ही वाहनांची भीषण धडक झाली.
शशिकला ध्रुवकुमार बोनगे (वय ६६), दीपाली नागेश बोनगे (वय ४२), ईश्वरी नागेश बोनगे (वय २२), शारदा महेश बोनगे (वय ४१), शीला राहुल बोनगे (वय ३७), इच्छा राहुल बोनगे (वय १५), प्रथमेश महेश बोनगे (वय ७), ध्रुवकुमार पांडुरंग बोनगे (वय ७०), मंगल वसंत सुतार (वय ६४), चंद्रकांत अतिगीडद (वय ४८, सर्व रा. गोकुळ चौक, इचलकरंजी), वासंती विलास सवाईराम (वय ६९, रा. पुणे), वैशाली अनिल दुर्गुळे (वय ४९), ज्योती दीपक मुदगल (वय ५०, रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.
