लख्ख सूर्यकिरणांवर पावसाळी ढगांचं सावट; मुंबईपासून विदर्भापर्यंत हवामान विभागाचा सावधगिरीचा इशारा

महाराष्ट्रात मे महिन्याची सुरुवात झालेली असतानाच हवामानानं अनेकांनाच चकवा दिल्याचं पाहायला मिळत आहे. जिथं मे महिन्यात होणाऱ्या होरपळीनं आधीपासूनच नागरिकांना धडकी भरवली होती, तिथं आता मात्र राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोकण क्षेत्रापासून मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इथं मुंबईलाही 6 ते 8 मे या कालावधीसाठी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील बहुतांश भागांमध्ये दिवसा काहीसं ढगाळ वातावरण आणि सायंकाळंतर सोसाट्याचा वारा सुटून पावसाच्या तुरळक सरींची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं पुढील तीन दिवस राज्यासह मुंबईत पावसामुळे तापमानात किंचित घट होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरातील हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्या कारणानं जाणवणारा उष्मा मात्र अधिक त्रासदायक ठरेल ही वस्तूस्थितीसुद्धा नाकारता येत नाही.

मुंबईमध्ये संभाव्य वादळी पावसाची हजेरी असू शकते अशा अंदाजासह वादळी वा-याची शक्यता ठाणे आणि पालघरमध्येही वर्तवण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक अहिल्यानगर, पुणे सातारा संभाजीनगर जालना बीड अमरावती भंडारा, चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर गोंदिया जिल्हांमध्ये पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. ऊन, वारा आणि पावसाच्या या वातावरणात राज्यात सर्वाधिक तापमानही विदर्भातच नोंदवलं जात असून,  हा आकडा अद्यापही 40 ते 42 अंशांच्याच घरात आहे. तर, मुंबई, पुणे आणि कोकणात मात्र पारा 36 ते 38 अंशांपर्यंत खाली आल्याचंही निदर्शनास येत आहे.

सलग तीन दिवस नागपुरात गारपीट 

उन्हाळा दिवसागणिक आणखी तीव्र होत असला तरीही त्याच्यावर गारपीट आणि अवकाळीचा मारा होत असल्यानं या उन्हाळ्याची तीव्रतासुद्धा काहीशी कमी भासत आहे. तिथं भर मे महिन्यात नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी गारपीटसह पाऊस झाला. सोमवार, 5 मे रोजी सायंकाळच्या सुमारास शहरातील काही भागांमध्ये हलक्या गारपीटीसह पावसानं हजेरी लावली, तर पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपूरातील्या बहुतांश भागांत गारपिटीसह पाऊस पाहायला मिळाला.

शेतशिवारावर पावसाची अवकृपा…

मागील 24 तासांमध्ये जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. या मान्सूनपूर्व पावसाने पिलखोड शिवाराला झोडपलं, अनेक भागात जोरदार वादळी वारा, पाऊस आणि गारपीट झाल्यानं मका, ज्वारी, बाजरी, तसेच शेतात काढून ठेवलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आणि भीती सध्या व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *