आजपर्यंत आपण अनेक आंदोलनं पाहिली असतील पण आज औरंगाबादमध्ये एक आगळंवेगळं आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन पत्नी पीडित नवऱ्यांनी केल्याने जरा हटकेच आहे.
पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या 20 ते 25 पुरुषांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालायसमोर खिचडी बनाव आंदोलन केलं. महिलांप्रमाणे पुरुषांसाठी तक्रार निवारण केंद्र सुरु करा अशी आंदोलकांची मागणी आहे.
महिलांपेक्षा पुरुषांवर अन्याय जास्त होतो. असा दावाही पीडित पुरुषांनी केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आकडेवारीनुसार 1 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2015 मध्ये महिलांनी 9 हजार 237 पुरुषांविरोधात तक्रारी दिल्या. मात्र पुरुषांच्या केवळ 345 तक्रारींची नोंद झाली आहे. याच काळात 1 हजार 939 पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत 759 महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे महिलांपेक्षा पती जास्त त्रस्त असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
पुरुष मुक्ती चळवळ, पुरुष अत्याचारविरोधी आंदोलन हे वाक्य आतापर्यंत नाटकात ऐकायला मिळायचे. पण औरंगाबादमधल्या या प्रकारानं त्याला वास्तववादी रुप दिलं आहे.

