29 ऑगस्टला मराठे मुंबईत धडकणार; मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणप्रश्नावर पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा दिला आहे. 29 ऑगस्टला मुंबईत उपोषण आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. राज्य सरकारने मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ते न पाळल्याने मनोज जरांगेंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मनोज जरांगेंचा पुन्हा ‘चलो मुंबई’ नारा

-मनोज जरांगेंचा आमरण उपोषणाचा इशारा

मराठा आरक्षणासाठी लढा देणा-या मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देऊनही मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्याने मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जरांगेंनी मराठा बांधवांना चलो मुंबईची हाक दिली आहे. आता अंतरवाली सराटीत नाही तर थेट मुंबईत सरकारच्या दारात आमरण उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. 6 जूनपर्यंत प्रलंबित मागण्या राज्य सरकारने पूर्ण न केल्यास मराठे 29 ऑगस्टला थेट मुंबईत धडकणार आहेत. मंत्रालयाबाहेर किंवा आझाद मैदानात उपोषणाला बसण्याचा निश्चय जरांगेंनी केला आहे.

काय आहेत जरांगेंच्या मागण्या 

– हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा
-मराठा आंदोलनकर्त्यांवरचे गुन्हे मागे घ्या
– कुणबी-मराठा एकच असल्याचा आदेश काढा
-सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा
-नोंदी सापडलेले प्रमाणपत्र तातडीने द्या
– मुलींसाठी मोफत शिक्षणाची अंमलबजावणी करा
-सारथीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या

2 वर्ष संयमाने घेतलं आता शांत बसणार नाही असं म्हणत जरांगेंनी सरकारविरोधात शड्डू ठोकलाय. तर दुसरीकडे पुन्हा एकदा राज्यात मराठा-ओबीसी वाद निर्माण होणार आहे. जरांगेंच्या उपोषणादिवशीच लाँग मार्च काढण्याची ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी घोषणा केली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातील आतापर्यंत झालेल्या सर्व बैठका निष्फळ झाल्या आहेत. आतातरी सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे.

20 जानेवारी 2024 रोजी मनोज जरांगेंनी अंतरवालीतून मुंबईला पायी मोर्चा काढला. तेव्हा सरकारने सगेसोयरेची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिल्याने जरांगेंनी माघारी गेले. मात्र तेव्हापासून आतापर्यंत सगेसोय-यांचं घोंगडं भिजत पडलंय. त्यामुळे जरांगेंच्या अल्टिमेटमआधीच सरकार तोडगा काढणार याकडे आता सर्वाचंच लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *