आजोबांच्या जमिनीवर नातवाचा दावा; खरेदीदाराला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न, नाशिकमधील घटना

सतरा वर्षांपूर्वी आजोबांनी विक्री केलेली जमीन आपल्या हिश्श्याची असल्याचे सांगत या जमिनीसाठी केलेली पन्नास लाखांची मागणी धुडकावली. यामुळे जमीन खरेदीदाराला नातवाकडून ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार गंगावाडी, एकलहरे येथे रविवारी रात्री घडला.

आशिष वामनराव हगवणे (रा. मानस बंगला, गुलमोहर कॉलनी, मुक्तिधमामागे, आनंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित प्रकाश शिंदे (रा. गंगावाडी) याच्याविरोधात नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आशिष हगवणे यांचे वडील वामन हगवणे यांनी सन २००६ मध्ये गंगावाडी येथे संशयित प्रकाश शिंदे याच्या आजोबांकडून चार एकर शेती खरेदी केली. परंतु, प्रकाश शिंदे आणि त्याचे वडील शिवाजी या दोघांनी ही जमीन आपल्या हिश्श्याची असून त्यासाठी नाशिकच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. जमीन द्या किंवा दावा मागे घेण्यासाठी पन्नास लाख रुपये द्या, अशी मागणी संशयित पिता-पुत्र आशिष हगवणे यांच्याकडे करीत होते. या कारणावरून रविवारी रात्री आशिष हगवणे हे राम कदम, कल्पेश खाडे या मित्रांसोबत गंगावाडी येथे शेतात कोंबड्यांना खाद्य घेऊन गेले होते.

यावेळी रात्री साडेनऊ वाजता प्रकाश शिंदे ट्रॅक्टर घेऊन आला आणि त्याने मुरलीचंद्र फॉर्मचे लोखंडी प्रवेशद्वार धडक देऊन पाडले. त्यानंतर कल्पेश खाडे यांच्या कारलाही ट्रॅक्टरची धडक देऊन कारचे नुकसान केले. त्यानंतर ट्रॅक्टर आशिष हगवणे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरसोबत आणलेले धारदार हत्यार काढून प्रकाश शिंदे अंगावर धावून आला आणि शेती करायची असेल, तर पन्नास लाख रुपयांची मागणी केली, नाहीतर मारण्याची धमकी दिल्याने जीव वाचविण्यासाठी आशिष हगवणे हे मित्र राम कदम, कल्पेश खाडे यांना घेऊन शेजारीच वास्तव्याला असलेले शेतकरी धनाजी शिंदे यांच्या घरी लपले. काही वेळाने संशयित प्रकाश हा ट्रॅक्टर घेऊन गेल्यावर आशिष आणि त्याच्या मित्रांनी नाशिकरोड पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली.

विनयभंगाचा गुन्हा
जमिनीच्या संदर्भातील न्यायालयातील दावा मागे घेत नाहीत म्हणून संशयित आशिष हगवणे याने गंगावाडी येथे आपल्या घरी येऊन शिवीगाळ करीत आपला हात ओढून खाली पाडून विनयभंग केल्याची फिर्याद प्रकाश शिंदे याच्या पत्नीने नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली. दावा मागे घ्यावा यासाठी आशिषने हातपाय तोडण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हवालदार सानप या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *