आरोग्य विभागाची मोठी कारवाई; राज्यातील तब्बल २९३६ शुश्रुषागृहांना नोटिसा, काय कारण?

सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याने आरोग्य विभागाने राज्यातील दोन हजार ९३६ शुश्रुषागृहांना कारवाई करण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाने जिल्हास्तरावर तपासणी पथके तयार करून मोहीम हाती घेतली होती. या अंतर्गत राज्यातील १९ हजार ३८८ शुश्रुषागृहांची तपासणी करण्यात आली.

महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम २०२१अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. वैद्यकीय आस्थापना कायद्यासह इतर नियमांचे पालन होते का, हे प्रामुख्याने पाहण्यात आले. तपासणी केल्यानंतर आरोग्य सेवा आयुक्तांकडे याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला. नियमावलीनुसार आणखी शुश्रुषागृहांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये डॉक्टरांना त्रास देऊ नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषदांमधील जिल्हा आरोग्य अधिकारी, पालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती करण्याचे आदेशही आरोग्य विभागाने दिले होते. नियमांची पूर्तता करण्यासाठी शुश्रृषागृहांना एक महिन्याची मुदत दिली आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *