सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जाताना अनर्थ; गडाजवळ टेम्पो उलटला, २६ भाविक जखमी

सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढली आहे. मंगळवारी (दि. २९) सकाळी ८.३० च्या दरम्यान दरेगावनजीक मोहनदरी फाट्यावर छोटा टेम्पो उलटल्याने अपघात झाला. यामध्ये २६ भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच नांदुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी मनसाराम बागूल, नीलेश शेवाळे आणि नितीन देवरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कळवण तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय बंगाळ यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर परिसरातील युवकांनीही मदतीसाठी धाव घेतली. कळवण येथील पंकज पाचपिंड यांनी आपल्या खासगी वाहनाने काही जखमींना वणी रुग्णालयात दाखल केले. तसेच नांदुरी येथील मालवाहतूक वाहन चालक-मालक संघटनेचे सदस्य व रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड, प्रशांत पाटील व घनश्याम निकम यांनीही मदतकार्यात मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *