न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. ज्या डॉक्टरांनी हजारो रुग्णांच्या मेंदूवर उपचार केले, त्याच डॉक्टरांना मेंदूत गोळी झाडून आपला जीव देण्याची वेळ का आली असा सवाल उपस्थित होत आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी वीस ते पंचवीस वर्षांत मोठं वटवृक्ष उभं केलं होतं. मागील 15 वर्षांत डॉ. शिरीष वळसंगकर यांनी म्युच्युअल फंडात सुमारे 160 कोटी रुपये गुंतवल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. ही गुंतवणूक एसआयपी या पद्धतीने केली आहे. एखाद्या व्यक्तीने मागील 15 ते 20 वर्षांत !60 कोटी रुपये गुंतवले असल्यास शेअर बाजाराच्या अनुषंगाने तिच्या वारसाला आता किमान 300 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मिळणे शक्य असल्याचे गुंतवणूक तज्ज्ञांनी सांगितले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी म्युच्युअल फंडात गेल्या 15 वर्षांत तब्बल 160 कोटी रुपये गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे.
डॉक्टरांच्या वारसांना मिळणार 300 कोटी
डॉ. शिरीष वळसंगकरांनी ही गुंतवणूक करत असताना वारस म्हणून कोणाच्या नावाची नोंद केली आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. डॉ. वळसंगकर यांचे मृत्युपत्र आणि वारसा असलेली कागदपत्रे दाखल केल्यानंतर संबंधितांना ती रक्कम मिळू शकणार आहे. पण, डॉ. शिरीष वळसंगकरांनी नॉमिनी म्हणून कोणाच्या नावाची नोंदणी केलेली आहे, याबाबत उत्सुकता लागली आहे.
डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्र हादरले
प्रख्यात न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूने सोलापूरसह राज्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. सोलापूरमधील पहिले न्युरोफिजिशियन डॉ. वळसंगकर यांनी रुग्णसेवेसोबत समाजसेवा करत अनेक रुग्णांवर मोफत उपचार देखील केले होते. अतिशय शांत स्वभावच्या डॉ. शिरीष वळसंगकरांनी अनेक रुग्णांना लळा लावला होता. 18 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आपल्या आयुष्याची अखेर केली. डॉ वळसंगकरांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे.
