एल्फिन्स्टन पुलाबाबत सावळा गोंधळ, स्थानिकांच्या मागण्या-प्रशासनाची भूमिकेतून मध्यमार्ग निघणार?

मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाबाबतचा सावळा गोंधळ आता वाढतच चाललाय. पुलाच्या तोडकामासाठी 25 एप्रिलपासून पूल बंद करण्यात आला. मात्र स्थानिकांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर प्रशासन झुकल्याचं दिसतंय. कारण अजुनही पुलावरची वाहतूक सुरूच आहे. पुल बंद, पूल सुरू अशी स्थिती सध्या पाहायला मिळतीये.

एल्फिन्स्टन पुलाच्या तोडकामाविरोधात स्थानिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. मुंबईतल्या प्रभादेवी आणि परळ या परिसरांना जोडणारा एल्फिन्स्टन पूल आता इतिहासजमा होणार आहे. नवीन पुलासाठी आताचा पूल तोडण्याचं काम हाती घेण्यात आलंय. पण आधी पुनर्वसन करा मग काम असं म्हणत स्थानिकांनी कडाडून विरोध केलाय. एल्फिन्स्टनजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आधी सोडवला गेला पाहिजे. तसेच पूर्व पश्चिम जाण्यासाठी पादचारी पुलाचे काम आधी पूर्ण करा मगच हा पूल पूर्णतः बंद करा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

पुलाच्या या पाडकामाच्या मुद्द्यावरून आता स्थानिक नेतेही पुढे आलेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आधी पुर्नवसन करा. सत्तेची मस्ती  आणि मस्तीची सक्ती अस सुरू आहे, असं ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हंटलय. ब्रिटीशकालीन हा एल्फिन्स्टन पूल पाडून आता नवा पूल उभारला जाणार आहे. यादरम्यान वाहतुकीसाठी काही उपाययोजना करण्यात आल्यात.

दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी टिळक पूलाचा वापर करण्यात येणार आहे. लोअर परळ, प्रभादेवी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या करी रोड पूलचा वापर करण्यात आलाय. भायखळा पूर्वेकडून कोस्टल रोड, सी लिंककडे जाण्यासाठी चिंचपोकळी पूल किंवा एस पूलचा वापर करण्यात येणार आहे.

मुंबईतला एल्फिन्स्टन पूल हा तब्बल 112 वर्षे जुना आहे. एमएमआरडीएकडून हा जुना पूल पाडून, त्याजागी नवीन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी उन्नत पुलाचं काम केलं जाणार आहे. मात्र वाहतूक बंद केल्यानंतर लागलीच नागरिकांनी विरोध सुरू केलाय. पूलही जीर्ण झाल्याने तोडकाम आणि नव्या पुलाची गरज आहे. पण आता स्थानिकांच्या विरोधामुळे गोंधळ निर्माण झालाय. पुनर्वसनासंदर्भात एमएमआरडीए आणि स्थानिक रहिवाशांची आता सोमवारी बैठक होणार आहे. स्थानिकांच्या मागण्या आणि प्रशासनाची भूमिका यातून काही मध्यमार्ग निघतो हे पाहावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *